30 November 2020

News Flash

प्रखर राष्ट्रभावना चेतवणारे तक्षकयाग

प्र. ल. मयेकरांचं ‘तक्षकयाग’ हे नाटक फारा वर्षांपूर्वी रंगभूमीवर येऊन गेलं. ऐश्वर्या आर्ट्स एन् थिएटर्स व यश क्रिएशन्सने आज पुनश्च ते रंगभूमीवर आणलं आहे. देश-काल-परिस्थितीची

| February 10, 2013 12:03 pm

प्र. ल. मयेकरांचं ‘तक्षकयाग’ हे नाटक फारा वर्षांपूर्वी रंगभूमीवर येऊन गेलं. ऐश्वर्या आर्ट्स एन् थिएटर्स व यश क्रिएशन्सने आज पुनश्च ते रंगभूमीवर आणलं आहे. देश-काल-परिस्थितीची निकड म्हणून आपण ते पुन्हा रंगमंचावर आणल्याचं दिग्दर्शक अविनाश नारकर म्हणतात. जागतिकीकरणाच्या रेटय़ाने आज देशोदेशींच्या सीमा पुसट होत असताना प्रखर राष्ट्रधर्माची हाक देणारं हे नाटक त्यांना का करावंसं वाटावं? याचा अर्थ आपल्या राष्ट्रभावना बोथट झालेल्या आहेत का? अविनाश नारकर यांचं म्हणणं तसंच आहे. आपण जितके ‘वैश्विक’ (ग्लोबल) होऊ पाहतो आहोत, तितकेच दिवसेंदिवस स्वार्थी व संकुचितही बनत चाललो आहोत. विश्वमानवतेची संकल्पना माणसांच्या मनांत रुजण्याऐवजी धर्म, जाती, वंश, वर्ण यांचीच विषवल्ली सर्वदूर फैलावताना दिसते आहे. म्हणजे निव्वळ भौतिक सुखसुविधांचा उपभोग घेण्यापुरतेच आपण वैश्विक आहोत का? बाकी मग आपण आपल्या जातीचे असतो. धर्माचे असतो. वर्ण-वंशाचे असतो. त्यातून उरलोसुरलो तर देशाचे असतो! एकीकडे आर्थिक उदारीकरणाची रसाळ फळे चाखत असताना माणसं जाती-धर्माच्या नावाने एकमेकांचे गळे घोटायलाही कमी करीत नाहीत. मग आपण सुसंस्कृत आणि प्रगल्भ झालो आहोत, या म्हणण्याला आधार काय?
आपला देश आज असंख्य व्याधींनी ग्रस्त आहे. सार्वत्रिक भ्रष्टाचार, महाकाय आर्थिक घोटाळे, संकुचित प्रांतवाद, जातीपाती आणि धर्माधतेचं क्षुद्र राजकारण, वाढती गुन्हेगारी आणि समाजात वाढत चाललेला पराकोटीचा स्वार्थ या सगळ्याला तोंड देता देता आपण नकळत त्याचाच एक भाग बनतो आहोत. ‘मी- माझं-माझ्यापुरतं’ हा अतिरेकी व्यक्तिवाद अंगिकारताना देशाचे एक सुजाण, सजग नागरिक म्हणून आपली कर्तव्यं मात्र आपण साफ विसरलो आहोत. देश, देशाभिमान या गोष्टींशी तर आपल्याला घेणंदेणंच नाही. वैश्विक होण्याच्या प्रक्रियेत आपण राष्ट्रवाद विसरलो तर ते ठीक आहे. परंतु प्रत्यक्षात वस्तुस्थिती तशी नाहीए. आपण आपल्या व्यक्तिगत स्वार्थातच इतके मग्न झालो आहोत, की देशाप्रती असलेल्या आपल्या जबाबदाऱ्यांची आपल्याला जाणीवच उरलेली नाही. म्हणूनच अविनाश नारकरांना राष्ट्रधर्मास साद घालणारं ‘तक्षकयाग’ नाटक करण्याची निकड भासत असावी.  
मूळात ‘तक्षकयाग’ हे फाळणीपूर्व आणि फाळणीउत्तर भारताची व्यथा-वेदना मांडणारं नाटक आहे. यातल्या पात्रांमध्ये नेहरू, गांधी, बॅ. जीना,  इंग्रज राज्यकर्ते यांचं स्पष्टास्पष्ट रूप जाणवत असलं (आणि लेखकालाही तोच इतिहास ंमांडायचा असला) तरीही हे काही इतिहासाचं यथार्थ चित्रण करणारं नाटक नाही. ते नाटककाराचं त्या कालखंडासंबंधीचं आणि त्या व्यक्तींबद्दलचं आकलन आहे. ते सखोल अभ्यासाधारित नाही. वरवरचं आहे.
‘तक्षकयाग’मध्ये महाकाल आणि हब्बाल या दोन धर्माचे राजकीय नेते अखंड भगीरथ देशाच्या फाळणीची बोलणी करत असताना महाकालांच्या धर्मपीठाचे महागुरू या फाळणीस कडाडून विरोध करतात. परंतु फुटीरतावादी हब्बाल नेते कौसर आणि महाकालांचे (नको इतके) शांततावादी नेते राजे मलयकेतू यांच्यापुढे त्यांचं काही चालत नाही. परकीय आलोम सत्तेच्या कुटील नीतीमुळे आणि हब्बाल नेते कौसर यांच्या हट्टाग्रहापुढे अखेरीस मान तुकवून मलयकेतू फाळणीस मान्यता देतात. भगीरथ देशाचे तुकडे होऊन महाकालांचे ‘भगीरथ’ आणि हब्बालांचे स्वतंत्र हब्बालस्तान निर्माण होते. फाळणीत दोन्हीकडचे हजारो लोक मारले जातात. अगणित निर्वासित होतात. आया-बहिणींची अब्रू लुटली जाते. कौसर यांच्या इच्छेनुसार स्वतंत्र हब्बालस्तान निर्माण होतो खरा; परंतु अल्पावधीतच ते हब्बालस्तानमधील लष्करशहांना नकोसे होतात. कौसर यांचा भ्रमनिरास होतो. फाळणीनंतरही हब्बालस्तानचे लष्करशहा भगीरथ देशाची सतत कुरापत काढीत राहतात. युद्धखोर कारवाया करत राहतात. आपल्या हस्तकांकरवी भगीरथ देशात दहशतवादी हल्ले करत राहतात. राजे मलयकेतू मात्र त्यांना जशास तसे प्रत्युत्तर देण्याऐवजी शांतता व अलिप्ततावादाची कास धरून शुभ्र कबुतरे तेवढी हवेत सोडत राहतात.
त्यांच्या या कणाहीन नीतीपायी शोकसंतप्त झालेले महागुरू मलयकेतूंविरोधात बंड करतात. त्यांना अटक करवून बंदिवासात टाकतात आणि त्यांचा धडाडीचा शूर पुत्र कुणाल याला गादीवर बसवतात. तो हब्बालांच्या आक्रमणाचा पाडाव करून त्यांना चांगलीच अद्दल घडवतो. महागुरूंच्या कन्येवर- वृषालीवर कुणालचं प्रेम असतं. तो तिच्याशी विवाहबद्ध होऊ इच्छित असतो. परंतु महागुरू त्याला राजकीय गरजेपोटी वृषालीऐवजी बलाढय़ शेजारी राष्ट्राच्या राजकन्येशी विवाह करण्याचा सल्ला देतात. परंतु राजपुत्र कुणाल त्यास राजी होत नाही. त्याला वृषालीशीच लग्न करायचं असतं. महागुरू त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न करतात. व्यक्तिगत भावनांपेक्षा राष्ट्रधर्म महत्त्वाचा, हे त्याला पटवू पाहतात. पण त्याला ते पटत नाही. महागुरूंचं म्हणणं वृषालीला मात्र पटतं. ती राष्ट्रधर्मासाठी आपल्या प्रेमाचं (आणि प्राणांचंही) बलिदान करते..      
प्र. ल. मयेकरांचं हे नाटक भारताच्या निकटच्या इतिहासावर आधारलेलं असलं तरी त्यातील प्रतिपादनाला वास्तवतेचा आधार आहे असं म्हणता येणार नाही. ‘तक्षकयाग’मधील देशपरिस्थितीचं त्यांचं आकलन हे त्यांच्यापुरतं योग्यही असेल; परंतु ते अपुऱ्या माहितीवर आधारित आहे. अर्थात यात त्यांनी केलेली राष्ट्रधर्माबद्दलची मांडणी मात्र कालातीत आहे. ‘तक्षकयाग’ नव्यानं रंगमंचावर आणताना प्र.लं.नी त्यांच्या मूळ संहितेत सद्य: परिस्थितीची नव्यानं भर घातली आहे. परिणामी या प्रयोगाला समकालीन मूल्यं प्राप्त झाली आहेत.  
अविनाश नारकर यांचं दिग्दर्शक म्हणून हे पहिलंच व्यावसायिक नाटक. प्रयोगात त्यांनी नाटकाचा आशय प्रामाणिकपणे पोहोचविण्याचा कसोशीनं प्रयत्न केला आहे. पात्रांच्या यथार्थतेपेक्षा त्यांची नाटय़गत भूमिका त्यांच्यासाठी महत्त्वाची ठरली आहे. परिणामी काही वेळा पात्रांच्या आगमन-निर्गमनाला ठोस कारण सापडत नाही. केवळ पात्राचं रंगमंचावरचं प्रयोजन संपलं म्हणून त्याचं निर्गमन होतं. परंतु ते स्वाभाविक वाटत नाही. दिग्दर्शक म्हणून याचा त्यांनी विचार करायला हवा. ‘तक्षकयाग’ हे काही सांगण्यासाठी लिहिलेलं नाटक असल्यानं त्याचं बेतलेपण प्रयोगातही उतरलं आहे. तथापि नाटकातला आशय वर्तमानाशी जोडण्यात दिग्दर्शक अविनाश नारकर यशस्वी झाले आहेत. राष्ट्रधर्माला साद घालण्याची त्यांची आंतरिक कळकळ त्यातून प्रतीत होते. आलोम नेत्याचं स्थान या नाटकात खरं तर कळीचं; परंतु प्रयोगात ते प्रकर्षांनं जाणवत नाही. आलोमची जरब, त्यांचा पाताळयंत्रीपणा कुठंही जाणवत नाही. तीच गोष्ट हब्बाल नेते कौसर यांची. त्यांचा धर्माधिष्ठित स्वतंत्र राष्ट्राचा दुराग्रह ज्या कडवटपणे व्यक्त व्हायला हवा तसा तो प्रयोगात येत नाही. राजे मलयकेतू ही तर पूर्णपणे कणाहीन व्यक्तिरेखा. मलयकेतू तोंडदेखली तत्त्वांची भाषा करीत असले तरी त्यामागची वैचारिक बैठक प्रत्ययाला येत नाही. अर्वाचीन भारतीय राजकारणाशी ताडून पाहता ज्यांच्याशी हे पात्र मेळ खातं त्या नेहरू-गांधींच्या धोरणांमागे त्यांचं असं ठोस तत्त्वज्ञान होतं आणि त्यावर ते ठाम होते. या सगळ्या पाश्र्वपटावर महागुरू हे एकमेव पात्र संहितेच्या भक्कम पािठब्यावर ठाशीवपणे उभं राहतं. राजपुत्र कुणाल तसंच वृषाली यांनाही आपापली भूमी आहे. संहितेतल्या या त्रुटी दिग्दर्शकाने लेखकाच्या ध्यानी आणून देऊन दुरूस्त करून घ्यायला हव्या होत्या. त्यामुळे नाटकाचा परिणाम अधिक गहिरा झाला असता. अर्थात ज्या आंतरिक तळमळीनं महागुरू एकहाती नाटक खेचून नेतात त्यामुळे नाटकाचा अपेक्षित परिणाम बऱ्याच अंशी साध्य होतोही; परंतु नाटक प्रेक्षकासोबत जायचं असेल तर तेवढं पुरेसं नाही. सगळ्याच व्यक्तिरेखांना ठोस पाया लाभणं आवश्यक होतं.
प्रकाश मयेकरांचं धगधगत्या अंगाराचं स्तरीय, सूचक नेपथ्य नाटकाची मागणी पुरवणारं आहे. शीतल तळपदेंनी प्रकाशयोजनेतून ऐतिहासिक वातावरण आणि पात्रांतर्गत संघर्ष अधोरेखित केला आहे. आघाती पाश्र्वसंगीतातून मनोहर गोलांबरे यांनीही आवश्यक ती वातावरणनिर्मिती केली आहे. कृष्णा बोरकर-दत्ता भाटकर यांची रंगभूषा आणि पूर्णिमा ओक यांची वेशभूषा नाटकाला काळाचे यथार्थ संदर्भ देतात.
‘रणांगण’नंतर अविनाश नारकर यांच्या शैलीदार वाचिक व कायिक अभिनयाला वाव देणारी मोठय़ा आवाक्याची भूमिका महागुरूच्या रूपानं त्यांना यात मिळाली आहे. त्यांनी तिचं सोनं केलं आहे. राष्ट्रधर्माबद्दलची त्यांची आंतरिक कळकळ, त्यामागचा व्यापक विचार त्यांच्या नसानसांतून वाहत असल्याचं जाणवतं. त्यामानाने अन्य पात्रांना ही विश्वासार्हता लाभलेली नाही. मिलिंद सफई यांनी साकारलेला कौसर काहीसा आक्रस्ताळा असला तरी त्यात अपेक्षित जोश, ईष्र्या आणि विखार आढळत नाही. त्यामुळे उत्तरार्धातील कौसरची पश्चातबुद्धी व वेदनाही तितकीशी भिडत नाही. राजे मलयकेतू झालेले कुणाल लिमये हेही शैलीदार अभिनयाचं कवचकुंडल लाभलेले अभिनेते आहेत. परंतु हे पात्र संहितेतच इतकं कमकुवत दाखवलेलं आहे, की त्याला कुठली वैचारिक वा तात्त्विक बैठक असेल असं वाटतच नाही. असला तकलादू राजा जगला काय, बंदिवासात गेला काय, मेला काय; त्यानं काय फरक पडतो? ललित प्रभाकर यांनी राजपुत्र कुणालची तडफ, वृषालीवरील त्याचं निरतिशय प्रेम आणि राजकीय अपरिहार्यतेपोटी प्रेमाचा बळी देण्यास त्यानं दिलेला ठाम नकार हे त्यांच्या व्यक्तित्वाला साजेसं होतं. मयुरा जोशी यांनी वृषालीचा समंजसपणा, राष्ट्रधर्माकरता प्रेमाचं बलिदान करण्याची उदात्त भावना उत्कटतेनं व्यक्त केलीय. सुशील मोहन यांचा आलोम अगदीच सामान्य आहे. महेश सुभेदार (देवदत्त), कपिल सुर्वे (विशाखादत्त), दीपक जायदे (सोल्दाद) आणि स्मित कांबळे (प्रतिहारी) यांनी आपली कामं व्यवस्थित केली आहेत.          

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2013 12:03 pm

Web Title: its become nation feelings to struggle out the takshak yag
टॅग Drama
Next Stories
1 झेप ‘जटायू’ ची !
2 प्रतिबिंब
3 मराठी सेलिब्रिटी कॅलेण्डर
Just Now!
X