शहरातील राजगोपालचारी उद्यान व रामेश्वर प्लॉट येथे ४ कोटी ३८ लाख रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या २४ लाख लिटर क्षमतेच्या जलकुंभ बांधकामाचा प्रारंभ महापौर प्रताप देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. लवकरच रामकृष्ण नगरमध्ये नाना-नानी पार्क उभारणीचे काम हाती घेतले जाणार असल्याची माहिती श्री. देशमुख यांनी दिली.
देशमुख यांच्या नगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीत शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता सुजल निर्मल योजनेंतर्गत सरकारने मंजुरी दिली. तीन वर्षांपूर्वी जलकुंभाचे भूमिपूजन झाले. नुकताच या जलकुंभाच्या कामास प्रारंभ झाला. जलकुंभाचे पाणी शिवाजीनगर, रामकृष्णनगर, विष्णूनगर, लोकमान्यनगर, राहुलनगर, कल्याणनगर, शिवरामनगर, संभाजीनगर, इकबालनगर, शारदानगर परिसरास मिळणार आहे, अशी माहिती महापौर देशमुख यांनी दिली. दिवाळीनंतर प्रत्येक प्रभागात २५ लाखांची विकासकामे करण्यात येणार आहेत. रामकृष्ण नगरमधील नाना-नानी पार्क लवकरच उभारण्यात येणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक डॉ. विवेक नावंदर होते. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष स्वराज परिहार, नगरसेविका अश्विनी वाकोडकर, संगीता वडकर, आकाश लहाने आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक परिहार यांनी केले. सूत्रसंचालन प्रमोद वाकोडकर यांनी केले.