ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे येत्या दि. १५ ला वयाचा अमृतमहोत्सव साजरा करीत आहेत. त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त दि. १५ ते २ ऑक्टोबर या दरम्यान विविध स्वरीपाचे ७५ सामाजिक उपक्रम राबवून जनतंत्र जागर अभियान साजरे कारण्यात येणार असल्याची माहिती भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे राज्य सरचिटणीस अशोक सब्बन यांनी दिली.
सब्बन यांनी सांगितले की हजारे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त देशभर अशाच स्वरूपाचे विविध उपक्रम राबवण्याचा निर्णय राळेगणसिध्दी येथे नुकत्याच जालेल्या बैठकीत घेण्यात आला. स्वत: अण्णांनी हा वाढदिवस साजरा करताना कोणाताही डामडौल किंवा पैशांचा अपव्याय करून नये अशा सक्त सूचना दिल्या आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्य़ात ७५ शिबिरे घेण्यात येणार आहेत. त्यातील पहिले शिबिर येत्या शनिवारी, रविवारी (दि. ८ व ९) भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन व अर्थक्रांती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे. राज्यातील प्रमुख मंडळी या शिबिरात सहभागी होणार आहे. जनलोकपाल विधेयक , जनलोकायुक्त व अर्थक्रांती या विषयांवर शिबिरात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ‘अर्थक्रांती’चे प्रणेते अनिल बोकील (लातूर), ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर (पुणे), जनलोकपाल विधेयकाचे अभ्यासक प्रा. बालाजी कोम्पलवार (नांदेड), अर्थक्रांतीचे सरचिटणीस प्रभाकर कोंडाळकर (पुणे) व शिक्षण क्षेत्रातातील अभ्यासक हेरंब कुलकर्णी यांचे दोन दिवसांच्या शिबिरात त्या, त्या विषयांवर व्याख्यान होणार आहे.
दोन दिवसांच्या या निवासी शिबिरात मर्यादित जागा उपलब्ध असल्याने इच्छुकांनी आधीच नावनोंदणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी ९४२२०८३२०६ या मोबाईलवर संपर्क साधावा अशे आवाहन सब्बन यांनी केले आहे. अशाच स्वरूपाची शिबिरे दि. २ आक्टोबपर्यंत घेण्यात येतील.