क्रांतिज्योती सावित्रीबाईंची आज जयंती
महात्मा फुले स्मारक आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक ही दोन्ही स्मारके जोडून दोन्ही स्मारकांच्या परिसराचा विकास तसेच सुशोभीकरण योजनेचे काम अद्यापही रखडलेले असून या संबंधी सातत्याने फक्त बैठका आणि घोषणाच होत असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
पुणे महापालिकेने महात्मा फुले पेठेत महात्मा फुले यांच्या राहत्या वाडय़ात त्यांचे स्मारक बांधले असून त्या जागेपासून सुमारे अडीचशे मीटर अंतरावर सावित्रीबाई फुले यांचे स्मारक विकसित करण्यात आले आहे. या दोन्ही वास्तूंना जोडणारा रस्ता तसेच त्याच्या आजूबाजूचा परिसर महापालिकेने विकसित करावा आणि परिसराचे सुशोभीकरण करावे, अशी मागणी फुले, शाहू, आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी सातत्याने केली होती. महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांनीही या मागणीचा पाठपुरावा सातत्याने केला. त्यानंतर या योजनेबाबत मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार, भुजबळ आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या बैठकाही झाल्या.
दोन्ही स्मारकांभोवती दाट लोकवस्ती असून परिसराचा विकास करायचा झाल्यास सुमारे पावणेदोनशे कुटुंबांचे पुनर्वसन करावे लागणार आहे. हे पुनर्वसन कशा पद्धतीने करावे यासाठी मे २०१२ मध्ये पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक होऊन सर्व कुटुंबांना विशेष प्रकल्पग्रस्तांचा दर्जा द्यावा म्हणजे जागामालक आणि भाडेकरू या दोन्ही घटकांचे पुनर्वसन करता येईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला होता. हा निर्णय झाल्यानंतरही पुनर्वसन वा स्मारके जोडण्यासंबंधीची कोणतीही कार्यवाही सुरू झालेली नाही.
‘घोषणा नको, कृती करा’
दोन्ही स्मारके जोडण्याच्या प्रस्तावाबाबत सातत्याने घोषणा व बैठकाच होत आहेत. अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही महापालिका प्रशासनाकडून झालेली नाही. केवळ लोकप्रियतेसाठी घोषणा न करता महापालिका प्रशासनाने परिसर विकासासाठी प्रत्यक्ष कृती करावी, अशी मागणी समता परिषदेचे पुणे विभागीय अध्यक्ष राजू घाटोळे यांनी केली आहे. या मागणीचा समता परिषदेतर्फे यापुढेही पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दोन्ही स्मारकांना जोडण्याची जी योजना तयार करण्यात आली आहे त्या योजनेनुसार सुमारे ७० हजार चौरसफूट जागेत हे काम केले जाईल. दोन स्मारकांच्या दरम्यान २५० मीटरचा रस्ता व चार मीटर उंचीची सुशोभीत सीमाभिंत बांधण्याचा प्रस्ताव असून समूहशिल्प, बागेचा विकास, सुशोभीकरण यासह अनेक कामांचा समावेश या योजनेत आहे. तीन कोटी रुपये खर्चाची ही योजनाही अद्याप कागदावरच आहे.
मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन- भुजबळ
नागपूरच्या अधिवेशनात जितेंद्र आव्हाड, गिरीश बापट यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. फुलेवाडा येथील उर्वरित योजना पूर्ण करण्यासंबंधी त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी आश्वासनही दिले आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. आम्ही ही मागणी सातत्याने करत आहोत. महापालिकेने या संपूर्ण योजनेला आता वेग द्यावा व काम सुरू करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.