तोचतोचपणा आलेल्या जीवनात काहीतरी वेगळं करायचंय, असे अनेकांना अनेकवेळा वाटतं. मग त्या वेगळेपणाचा शोध घेतला जाऊ लागतो. तो वेगळेपणा कधी अनपेक्षितपणे समोर येऊन ठाकतो तर कधी एखाद्या यातनेतून. त्या यातना भोगल्यानंतर आलेल्या त्या वेगळेपणाकडे केवळ ‘चेंज’ म्हणून न बघता, तो होतो एक ध्यास!
असाच ध्यास घेऊन आपल्यातील कलाकाराला पुन्हा तेवढय़ाच ताकदीने सादर करण्याबरोबरच नवोदित कलाकारांनादेखील व्यासपीठ मिळवून देण्यासाठी धडपडणारा तो अवलीया म्हणजे के.टी. उर्फ नितीन सुतार. त्यांच्या ‘जटायू सांस्कृतिक संस्थे’तर्फे पुण्यनगरीत नुकताच एक वेगळा उपक्रम राबविला. नाटय़क्षेत्राशी संबंधित कोणतेही प्रशिक्षण न घेतलेल्या सुतार यांनी आजारपणावर मात करीत राबविलेल्या या उपक्रमाला सुजाण प्रेक्षकांनीदेखील मनमुराद दाद दिली नसती तरच नवल. संस्थेच्या १३ व्या वर्धापनदिनानिमित्त एकाच दिवशी दोन अंकी सलग चार नाटय़प्रयोग करण्याची त्यांनी घोषणा केली आणि ती पारदेखील पाडली. नाटकांचे लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाश योजना, संगीत संयोजन याबरोबरच या महोत्सवाची निर्मितीदेखील ‘जटायू’चे अध्यक्ष सुतार यांचीच होती.
घशाच्या कर्करोगावर मात करून आणि मुख्य म्हणजे नवोदित कलाकारांना बरोबर घेऊन अशा प्रकारे महोत्सव करण्याचे सुतार यांचे वेगळेपण प्रेक्षकांनाही भावले. आजारपणातून बाहेर पडलेल्या आणि वयाच्या ५१ व्या वर्षी तरुणांच्या उत्साहाला लाजवेल अशा उत्साहात तेवढय़ाच ताकदीने त्यांनी या सगळ्या नाटकांमधून मध्यवर्ती भूमिका पार पाडल्या.  
 ‘सारिपाट’, ‘असं का व्हावं?’, ‘कडवं’, ‘आम्ही सारे भिकारी’ अशा नाटकांमधून विविध विषय हाताळले आहेत. समाजातील जाचक आणि करुणादायी गोष्टींचा एका तरुणाला फटका बसतो आणि तो तरुण गुंड प्रवृत्तीचा होतो. पण त्याला त्या प्रवृत्तीपासून परावृत्त करण्यासाठी धडपडणाऱ्या भावी पत्नीचा त्याग करणाऱ्या प्राध्यापकाची कहाणी ‘सारिपाट’मधून दाखविण्यात आली होती. रहस्य, विनोद यांची सरमिसळ असलेले  ‘आम्ही सारे भिकारी’ हे नाटक असून ‘असं का व्हावं?’ आणि ‘कडवं’ ही दोन्ही नाटकेदेखील सामाजिक विषयालाच वाहिलेली होती. सुतार यांनी केवळ दोन वर्षांमध्ये एकांकिका, दीर्घाक, कादंबऱ्या, नाटके अशी एकूण १८ पुस्तकेही लिहून पूर्ण केली आहेत.  
सतीश सूर्यवंशी आणि हनुमान यांच्या नेपथ्य संयोजनात तर हृषिकेश, अवधूत यांच्या संगीत संयोजनात ही चारही नाटके सादर करण्यात आली. प्रकाशयोजनेची जबाबदारी सांभाळली होती अश्विन आणि रोहन यांनी. मेधा देशपांडे, अभिजित कोरे, शाम सावंत, अनघा देशपांडे, रवींद्र तळपाडे, मंगेश जाधव, शुभांगी मिसाळ, हर्षल डहाके, अमृता गाडवे, अमृतेश गाडवे, उत्तरेश्वर आरकडे, प्रमोद साखरे, रुचिता देशपांडे आदी कलाकारांनी आपल्या अभिनयाची चुणूक या नाटकांमधून दाखवली. रंगमंचावरील कलाकारांसह पडद्यामागील अनेकांनी घेतलेल्या कष्टाचे चीज झाल्याचे सार्थ भाव रात्री जेव्हा हे प्रयोग संपले तेव्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होते.
कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे व सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून रंगभूमीची सेवा करण्याचा संस्थेचा उद्देश असून अशाप्रकारचे महोत्सव एकाच ठिकाणी न करता राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी करण्याचा सुतार यांचा मानस नक्कीच पूर्णत्वास जाईल याची आशा नव्हे  खात्री हे नाटय़प्रयोग बघितलेल्या प्रत्येकालाच वाटत असेल, असे म्हणल्यास वावगे ठरू नये.