नेहरू योजनेच्या कामांची देखरेख, कामांचा आढावा व सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी खासदार सुरेश कलमाडी यांची नियुक्ती झाली असून ही नियुक्ती रद्द करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. कलमाडी यांना या समितीचे अध्यक्ष करण्याबाबत केंद्र सरकार ठाम राहणार असेल, तर राष्ट्रवादीचा एकही आमदार तसेच महापौर समितीमध्ये सहभागी होणार नाहीत, असाही इशारा राष्ट्रवादीने दिला आहे.
केंद्र सरकारच्या निधीमधून जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियानाचा दुसरा टप्पा आगामी आर्थिक वर्षांपासून सुरू होत आहे. पुणे आणि पिंपरी या दोन्ही महापालिकांनी नेहरू योजनेसाठी विविध प्रकल्प पाठवले असून त्यातील काही प्रकल्पांना मंजुरीही मिळाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील कामांची देखरेख, कामांबाबतचा सल्ला तसेच परीक्षण यासाठी त्या त्या महापालिकांमध्ये समित्या नेमण्यात येत आहेत. पुणे आणि िपपरीसाठीच्या समितीचे अध्यक्षपद खासदार सुरेश कलमाडी यांना देण्यात आले असून दोन्ही शहरांसाठी एकच समिती असल्याने उपाध्यक्षपद खासदार गजानन बाबर यांना देण्यात आले आहे. दोन्ही शहरांचे खासदार, आमदार, महापौर हे या समितीचे सदस्य असतील.
खासदार कलमाडी यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्यामुळे या नियुक्तीला राष्ट्रवादीने आक्षेप घेतला आहे. याबाबत पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे म्हणाले की, राष्ट्रकुल स्पर्धामधील घोटाळाप्रकरणी कलमाडी यांच्यावर आरोप असून त्यांच्या विरोधात न्यायालयात खटलेही चालू आहेत. या खटल्यांमधून त्यांची अद्यापही निर्दोष सुटका झालेली नाही. त्यामुळे त्यांना या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त करू नये, अशी आमची मागणी आहे. खासदार प्रकाश जावडेकर वा गजानन बाबर वा अन्य कोणाचीही नियुक्ती आम्हाला चालेल; पण कलमाडी यांच्या नियुक्तीला आमचा विरोध राहील.
आमच्या मागणीनंतरही त्यांनाच या पदावर कायम ठेवण्याचा निर्णय केंद्राने केला, तर पुणे आणि पिंपरीतील राष्ट्रवादीचे खासदार, आमदार आणि दोन्ही शहरांचे महापौर या समितीवर बहिष्कार घालतील. तसेच समितीच्या कामकाजात कोणताही सहभाग घेणार नाहीत, असेही काकडे यांनी सांगितले.
आपटे, देसाई, देवकर यांचीही नियुक्ती
या समितीवर विविध विषयांमधील तज्ज्ञ तसेच स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधीही घेतले जाणार आहेत. मात्र, या सर्व नियुक्त्या राजकीय पद्धतीनेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी या गटातून माजी नगरसेवक अजित आपटे यांची नियुक्ती झाली असून सामाजिक कार्यकर्ता प्रतिनिधी या गटातून माजी नगरसेवक डॉ. सतीश देसाई यांची नियुक्ती झाली आहे. समितीमधील महिला गटातील जागेसाठी स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा संगीता देवकर यांची नियुक्ती झाली आहे. या सर्व नियुक्त्या कलमाडी यांच्याच शिफारशीनुसार झाल्याचे केंद्रीय नगरविकास मंत्री कमलनाथ यांनी ९ जानेवारी रोजी कलमाडी यांना पाठवलेल्या पत्रातून स्पष्ट झाले आहे.
कलमाडींची नियुक्ती;  सत्ताधारी आमने-सामने
नेहरू योजनेच्या सल्लागार व आढावा समितीच्या अध्यक्षपदावर खासदार सुरेश कलमाडी यांची नियुक्ती झाल्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आमने-सामने आले आहेत. कलमाडी यांची नियुक्ती केंद्राकडून झाली असून ती रद्द होण्याची शक्यता कमी असल्यामुळे राष्ट्रवादीचा समितीच्या कामकाजावरील बहिष्कार कशापद्धतीने अमलात येणार याबाबत उत्सुकता आहे. गेले काही महिने सत्ताधारी दोन्ही काँग्रेसमध्ये अनेक मुद्यांवर महापालिकेत सुरू असलेले वादंग या नियुक्तीमुळे अधिकच वाढणार असून पिंपरीतही त्याचे लोण पसरणार आहे.