कपालेश्वर पतसंस्थेच्या मखमलाबाद शिवारातील जप्त मालमत्तेच्या नोंदी रद्द करण्याचा व सातबारा उताऱ्यावर नोंद करणाऱ्या संबंधित तलाठी आणि अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णय उपविभागीय अधिकारी विनय गोसावी यांनी घेतला आहे.
कपालेश्वर पतसंस्थेत १० हजार ठेवीदारांच्या ३२ कोटी ठेवी अडकल्या आहेत. या ठेवीदारांपैकी अनेक जण निरनिराळ्या समस्यांमुळे हैराण आहेत. त्यांना पैशांची सक्त गरज असतानाही ठेवी मिळू शकत नाहीत. यासंदर्भात जिल्हा शासकीय कृती समितीच्या बैठकीत काही ठेवीदारांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी कायदेशीर कारवाईचे आदेश दिले होते. राष्ट्रवादीचे नगरसेवक विनायक खैरे यांनी कपालेश्वर पतसंस्था बुडविणारे विनायक लोंढे यांच्या कुटुंबियांकडून मखमलाबाद शिवारातील दूध डेअरी असलेली जमीन शर्त खरेदी केली होती. ठेवीदार हितसंवर्धन कायद्यानुसार ही मालमत्ता उपविभागीय अधिकाऱ्यांनी जप्त केली होती. राजपत्रात या जप्तीची नोंद झालेली आहे. सातबारा उताऱ्याच्या इतर हक्कात जप्तीची नोंद झालेली आहे. या निकालाविषयी ठेवीदारांनी समाधान व्यक्त केले आहे.