मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर झालेली बोलणी फिसकटल्याने अंगणवाडी कर्मचा-यांचा संप सुरूच राहणार असल्याची माहिती नगर जिल्हा अंगणवाडीसेविका, मदतनीस कर्मचारी युनियनचे सहसचिव जीवन सुरुडे यांनी दिली.
अंगणवाडीसेविका व मदतनिसांनी दि. ६पासून संप सुरू केला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महिला व बालविकासमंत्री वर्षां गायकवाड, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, मुख्य सचिव उज्ज्वल उखे यांच्या उपस्थितीत अंगणवाडी कृती समितीची बैठक झाली. बैठकीत एकरकमी निवृत्तिवेतन देण्याचे तोंडी आश्वासन देण्यात आले. परंतु संघटनेने तसा आदेश काढण्याचा हट्ट धरला. तसेच वेतनवाढ करण्याबाबत कोणताही ठोस निर्णय दिला नाही. सेविका व मदतनीस यांच्या वेतनातील तफावत कमी करण्याचा निर्णयही झाला नाही. त्यामुळे संप सुरूच राहणार असल्याचे सुरुडे यांनी सांगितले.
अंगणवाडी कर्मचा-यांच्या मागण्यांसाठी संघटना वर्षभरापासून आंदोलन करीत आहे. मुंबई येथे मोर्चा काढण्यात आला. रास्ता रोको करण्यात आला, पण अद्याप ठोस आश्वासन सरकारकडून मिळाले नाही, त्यामुळे आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अंगणवाडी कर्मचा-यांनी सरकारच्या दबावाला बळी न पडता संप अधिक तीव्रपणे चालवावा असे आवाहन बाळासाहेब सुरुडे, राजेंद्र बावके, शरद संसारे, मदिना शेख यांनी केले आहे.