24 November 2017

News Flash

कोरबा-मिठागर आघाडीवर!

राज्य सरकारने जाहीर केलेल्या नवीन रेडी रेकनर दरपत्रकात शहर विभागात सर्वात जास्त दरवाढ कोरबा

प्रतिनिधी, मुंबई | Updated: January 3, 2013 1:48 AM

राज्य सरकारने जाहीर केलेल्या नवीन रेडी रेकनर दरपत्रकात शहर विभागात सर्वात जास्त दरवाढ कोरबा – मिठागर भागात ४८ टक्के इतकी झाली आहे. तर सर्वात कमी दरवाढ दक्षिण मुंबईतील कुलाबा येथे अवघी ७.२८ टक्के झाली आहे.
रेडी रेकनरच्या दरातील वाढीमुळे मुंबईतील जागांचे भाव वाढून घरांच्या किमतीवरही त्याचा परिणाम होणार आहे. घरांची किंमत शिवाय मुद्रांक शुल्कही त्यामुळे वाढणार आहे. मागील वर्षांत त्या भागात मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार ज्या दराने होतात साधारण त्याचा विचार करून नवीन रेडी रेकनर दर ठरवण्यात येतात.
त्यादृष्टीने विचार केल्यास उच्चभ्रूंची वस्ती म्हणून ओळखले जाणारे मलबार हिल, कुलाबा, भुलेश्वर, या भागांतील दरवाढीचे प्रमाण तुलनेत कमी आहे. या भागांतील रेडी रेकनरचे दर सात ते १३-१४ टक्क्यांपर्यंतच वाढले. तर भायखळा, माझगाव, परळ, वरळी आदी भागांतील दरवाढीचे प्रमाण हे २० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. गेल्या काही काळांत नवीन व्यावसायिक आस्थापने, पुनर्विकास आणि नवीन टॉवरचे प्रकल्प या भागांत अधिक येत असल्याने या परिसराने दरांच्या टक्केवारीत नेहमीच्या उच्चभ्रूंच्या वस्तीवर मात केल्याचे चित्र आहे.
वडाळा हे भविष्यातील व्यावसायिक केंद्र म्हणून ओळखले जात आहे. शिवाय तेथे मोनोरेलही लवकरच सुरू होत आहे. या घडामोडींमुळे मिठागारांनजीकचा वडाळा परिसर हा मुंबई शहरातील सर्वात जास्त प्रमाणात दरवाढ झालेला भाग ठरला आहे. तर कुर्ला-घाटकोपर आणि विक्रोळी पट्टय़ात उच्चभ्रूंची वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवई परिसराने दरवाढीचा लौकीक कायम राखला आहे. या ठिकाणचा रेडी रेकनर दर २८.८४ टक्क्यांनी वाढला. पूर्व उपनगरे, पश्चिम उपनगरे आणि मुंबई शहराकडे जाण्यासाठी मध्यवर्ती ठिकाण, विमानतळाला जवळ अशा विविध कारणांमुळे या भागांतील घरांना चांगली मागणी असून त्याचाच परिणाम वाढीत झाला आहे. तर सर्वात कमी वाढ कुर्ला परिसरात नोंदवली गेली. कुल्र्यातील परिसरात दर वाढण्याऐवजी कमी होऊ १.२२ टक्क्यांनी घटला.
विक्रोळी आणि जवळचा हरियाली परिसरात २२.३० टक्क्यांपर्यंत दरवाढ झाली. विक्रोळी परिसर हा पूर्व उपनगरांत असला तरी मुंबई शहर व पश्चिम उपनगरांकडे जाण्यासाठी तो मध्यवर्ती भाग असल्याने या भागातील रेडी रेकनरचे दर तुलनेत अधिक प्रमाणात वाढले आहेत. सध्या या भागांत मोठे प्रकल्पही सुरू आहेत. आणिक परिसरात पूर्व मुक्त मार्ग जात असून त्या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे याही भागात जागांच्या उलाढाली वाढून रेडी रेकनरचे दर २६ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत.
तर घाटकोपर, चांदिवली, तुंगवा आदी भागांतील नवीन उलाढाली मर्यादित असल्याने विस्तार थांबल्याने या ठिकाणांचे दर ११-१२ टक्क्यांच्या मर्यादेत वाढल्याचे चित्र आहे.
सर्वाधिक दरवाढ नोंदवले गेलेले भाग (दर प्रति चौरस फूट)
ठिकाण                   २०१२    २०१३    वाढ
मिठागार                    ६२९८    ९३३५    ४८.२१ टक्के
दादर-नायगाव      ९१११    ११७६३    २९.११ टक्के
परळ-शिवडी      १०२१९    १२६०९    २३.३९ टक्के
पवई                    ९१०५      ११७३१    २८.८४ टक्के
आणिक                    ६६९१      ८४६१    २६.४६ टक्के
मारवली                    ३६९८      ४५३५    २२.६१ टक्के

First Published on January 3, 2013 1:48 am

Web Title: korba saltgodown is in lead
टॅग Korba,Salt