कर्जत तालुक्यातील सीना धरणात कुकडीचे पाणी सोडण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले असून त्याची अंमलबजावणी होणारच आहे. मात्र, श्रीगोंदे तालुक्याचे आवर्तन संपल्यावर दि. १६ला पाणी सोडण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज मिरजगाव येथे केले.
मिरजगाव येथे जिल्हा परिषद सदस्य परमवीर पांडुळे यांनी दुष्काळी शेतकरी मेळावा घेतला. त्यावेळी थोरात बोलत होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, बाळासाहेब थोरात, शिवाजी नागवडे, राहुल जगताप, प्रवीण घुले, किरण ढोबे, बाळासाहेब साळुंके, कैलास माने, तुकाराम दरेकर, तात्या ढेरे, रामभाऊ धांडे, डॉ. सुभाष सूर्यवंशी, अंबादास पिसाळ, दीपक भोसले, आदिनाथ चेडे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, राज्यावर दुष्काळाचे संकट आहे. कर्जत तालुक्यात त्याची तीव्रता जास्त आहे. सीना धरणात पाणी सोडण्यासाठी पांडुळे यांनी उपोषण केले. नंतर थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांच्या प्रयत्नाला यश आले असून दि. १६ला सीनामध्ये पाणी सोडण्यात येणार आहे, असे सांगताच उपस्थित शेतकऱ्यांनी जल्लोष केला. मागील वर्षी कर्जत तालुक्याला राज्यात सर्वात जास्त चारा देण्यात आला. पण तो कोठे गेला, हा भाग वेगळा, असाही टोला थोरात यांनी लगावताना राज्यात दुष्काळासाठी दररोज २ कोटी रूपये खर्च करावा लागत असल्याचे सांगितले.