तीन जिल्हय़ांतील सव्वाशे गावे अंधारात, ५० पाणीयोजना बंद!
दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मराठवाडय़ावर निसर्गाने पुन्हा घाला घातला.नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्यामुळे नांदेड, परभणी व  हिंगोली जिल्हय़ांत महावितरणचे तब्बल पाच कोटींचे नुकसान झाले. तब्बल सव्वाशे गावे अंधारात आहेत. याशिवाय ५० पाणीपुरवठा योजना विजेअभावी बंद पडल्या आहेत.
मराठवाडय़ात सध्या भीषण दुष्काळ आहे. थेंब थेंब पाण्यासाठी लोकांना रणरणत्या उन्हात वणवण भटकावे लागत आहे. त्यातच ज्या गावांमध्ये पिण्यास थोडेफार पाणी उपलब्ध आहे, तेथे विजेअभावी लोकांची धावपळ होत आहे. मराठवाडय़ात दुष्काळ ज्या पद्धतीने थैमान घालत आहे, त्या पद्धतीनेच नांदेड, परभणी व हिंगोली जिल्हय़ांत वादळी वारे व गारपीट होत आहे. या बेमोसमी वाऱ्यामुळे महावितरणला तब्बल पाच कोटी रुपयांचा फटका बसला आहे.
वादळी वाऱ्यामुळे ११ केव्ही लाईन्स, अनेक उपकेंद्रे जायबंदी झाली आहेत. मुख्य वीजवाहिनी तुटल्यामुळे तब्बल सव्वाशे गावांचा वीजपुरवठा ४८ तासांपासून खंडित झाला आहे. यात नांदेड जिल्हय़ातील ६८ गावे, परभणी ४८ व हिंगोली जिल्हय़ातील ९ गावांचा समावेश आहे. जिल्हानिहाय नुकसानीची आकडेवारी पाहिल्यास महावितरणला नांदेडमध्ये २ कोटी रुपये २५ लाख, तर परभणीत १ कोटी ५० लाख, तर हिंगोली जिल्हय़ात ७५ लाख रुपयांचे नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे परभणीत १४ पाणीपुरवठा योजनांची वीज खंडित झाली, तर नांदेडात २५ व हिंगोलीतील ११ पाणीपुरवठा योजनाही विजेअभावी बंद पडल्या आहेत. महावितरणचे प्रभारी मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांच्याशी संपर्क साधला असता दुष्काळाची भीषण स्थिती लक्षात घेता महावितरणने सर्वात आधी पाणी योजनांचे फीडर दुरुस्तीचे काम हाती घेतल्याचे सांगितले. निम्मे फीडर पूर्ववत केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. उर्वरित गावांची वीज लवकरच सुरू होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
नांदेड जिल्हय़ातील देगलूर, मुखेड, अर्धापूर व भोकर तालुक्यांत महावितरणच्या नुकसानीचे प्रमाण जास्त आहे. ग्राहकांना त्रास होऊ नये, म्हणून महावितरणने विशेष पथके तयार करून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.