जिल्ह्य़ात सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे फळबागांचे प्रचंड नुकसान झाले. घरावरील पत्रे उडणे व जुनी झाडेही मुळासकट उन्मळून पडण्याचे प्रकारही ठिकठिकाणी घडले. औसा तालुक्यातील सतधरवाडी येथे एक गाय वीज पडून ठार झाली, तर लातूर तालुक्यातील ममदापूर येथील शेतकरी जखमी झाला.
मंगळवारी सायंकाळी जिल्ह्य़ात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. अहमदपूर तालुक्यात वीज पडून एक ठार व अन्य दोघे जखमी झाले. बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्याची पुनरावृत्ती झाली. लातूर, औसा, निलंगा, उदगीर, शिरूर अनंतपाळ तालुक्यांत पावसापेक्षा वाऱ्याचा जोर जास्त होता. विजेचा कडकडाट मोठय़ा प्रमाणावर होता. औसा तालुक्यातील माळकोंडजी, किल्लारी, गुबाळ, मातोळा परिसरात वाऱ्यामुळे विजेचे खांब वाकले. झाडे उन्मळून पडली. आंबा, चिंच व द्राक्षबागांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. किल्लारी परिसरातील विविध घरांवरील सुमारे ४०० पत्रे उडाल्याचे वृत्त आहे. या वर्षी प्रारंभापासूनच द्राक्षबागांवर संकट होते. ऐन काढणीच्या मोसमाच्या वेळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आंब्याचे उत्पादन यावर्षी कमी झाले असले, तरी शिल्लक राहिलेला आंबाही वाऱ्याने गळून गेला. गुरुवारी बाजारपेठेत कैऱ्यांची आवक मोठय़ा प्रमाणात होती. मातीमोल किमतीने कैऱ्या विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. मार्चपासून अवकाळी पावसाने पाठलाग केल्यामुळे शेतकऱ्यांना भीती बसली आहे. कमी वेळेत अधिक नुकसान या पावसामुळे होते. जनावरे दगावणे व मनुष्यहानी होण्याचे प्रमाणही दरवर्षी वाढत आहे.नववर्षांच्या प्रारंभी पाऊस झाल्यामुळे समाधान व्यक्त केले जात असतानाच वर्षांच्या प्रारंभी पडणारा अवकाळी पाऊस चांगला की वाईट यावर चांगलाच खल होतो आहे.