खा. वाकचौरे, आ. कांबळेही संतापले
नरेगाचे काम ठप्प, खंडकऱ्यांना जमीन वाटपाला झालेला विलंब, दुष्काळात महावितरणने दिलेला झटका अन् कोलमडलेले पाटपाण्याचे नियोजन यामुळे लोक त्रस्त झाले आहेत. माजी खासदार बाळासाहेब विखे यांच्या दौऱ्यामुळे लोकांच्या वेदनेला वाट मिळाली. अनेकांच्या यातना ऐकून विखे यांच्याबरोबरच शिवसेनेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे व आमदार भाऊसाहेब कांबळे यांचाही संताप अनावर झाला.
दुष्काळी परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर विखे यांनी आयोजित केलेल्या दौऱ्याला मोठा प्रतिसाद मिळाला. विखे व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांच्यात राजकीय दरी वाढली असून समर्थकांनी प्रयत्न करूनही दौऱ्यात ससाणे सहभागी झाले नाहीत. मात्र, आमदार कांबळे व दौरा सर्वपक्षीय असल्याने खासदार वाकचौरे सहभागी झाले होते. विशेष म्हणजे पढेगाव येथील बैठकीस राष्ट्रवादीचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचे समर्थकही उपस्थित राहिले. तब्बल १५ वर्षांनंतर हे चित्र बघायला मिळाले.
पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनी प्रत्येक तालुक्यात जाऊन नरेगाच्या बैठका घेतल्या. नंतर प्रत्येक गावात ग्रामसभा झाल्या. हजारो लोकांनी जॉबकार्ड तयार केले. शौचालये, गायगोठे, कोंबडी फार्म, सेंद्रिय खताचे ओटे आदी व्यक्तिगत व सार्वजनिक लाभांच्या योजनांची कागदपत्रे तयार करण्यात आली. त्यावर हजारो रुपयांचा खर्च झाला. आता हे काम ठप्प झाले. बैठकीत अनेकांनी त्यासंबंधी तक्रारी केल्या.
दुष्काळी परिस्थिती असूनही ५० पैशांपेक्षा जास्त आणेवारी लावण्यात आली. महसूल खात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना तसा आदेश वरिष्ठांकडून होता. आता त्याविरूद्ध हरकती दाखल झाल्या आहेत. फेरसव्र्हे करून खरी आणेवारी जाहीर करावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. दुष्काळ असूनही महावितरणने वीजपुरवठा खंडीत करण्यास प्रारंभ केला आहे. बील वसुलीसाठी अनेक रोहित्रे बंद केली आहेत. नवीन वीजजोडसाठी महावितरणचे कर्मचारी पैसे मागतात पाटपाण्याचा पुरता फज्जा उडाला आहे. पाटाच्या पाण्यासाठी अधिकारी व कर्मचारी पैसे उकळतात, अशा गंभीर तक्रारी अनेक शेतकऱ्यांनी केल्या.
खंडकरी शेतकऱ्यांना जमिनीचे वाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. चाऱ्या व रस्त्यांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जात आहेत. अधिकारी नगरला बसतात. शेतकऱ्यांना खेटे मारायला लावतात. शेतकऱ्यांना भीती दाखवून त्यांच्याकडून काही अधिकारी पैसे उकळतात. खंडकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण टाकण्याची भीती आहे. पाटपाण्याचा हक्क देण्यात आलेला नाही, अशा एक ना अनेक तक्रारींचा पाढा खंडकरी शेतकऱ्यांनी मांडला. विखे, वाकचौरे व कांबळे या तक्रारी ऐकून अस्वस्थ झाले. त्यांनी तातडीने तहसील कार्यालयात सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची प्रांताधिकारी सुहास मापारी यांच्या उपस्थितीत बैठक बोलावली. या बैठकीस लोक प्रतिनिधींव्यतिरीक्त कुणालाही प्रवेश देण्यात आला नव्हता. सुमारे चार तास ही बैठक चालली. आता या प्रश्नावर मंत्र्यांकडे बैठक लावून ते सोडविण्याचा निर्णय विखे यांनी जाहीर
केला.
खंडकऱ्यांच्या जमिनीवर कुठलेही आरक्षण टाकले जाणार नाही, असे जाहीर करण्याचा सल्ला विखे यांनी कांबळे व वाकचौरे यांना दिला. आरक्षण टाकले तर आपण खासदारकी पणाला लावू असे वाकचौरे यांनी जाहीर केले, पण कांबळे यांनी मात्र मौन बाळगले. बैठकीत अण्णासाहेब थोरात, जी. के. पाटील, एकनाथ गुलदगड, बापू सदाफळ, गिताराम खरात, राजेंद्र पाऊलबुद्धे, बबन मुठे, के. वाय. बनकर, दगडू मैड, सोपान नाईक, सुरेखा कासार आदींनी प्रश्न मांडले. दौऱ्यात विखे यांचे कट्टर समर्थक रामभाऊ लिप्टे, नानासाहेब पवार, दीपक पटारे, गिरीधर आसणे, शिवसेनेचे अशोक थोरे, तसेच ससाणे समर्थक बाबासाहेब दिघे, मुरली राऊत आदी सहभागी झाले होते.