देशापुढे धार्मिकवाद, नक्षलवाद, आतंकवाद, बनावट चलन, सामाजिक सलोखा, दुष्काळ असे अनेक चिंतेचे विषय आहेत. शिक्षण क्षेत्रात देशाने प्रगती केली आहे. मात्र त्यातून संस्कारित होण्यासाठी मूल्यांची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन गिरीश गांधी यांनी केले.
येथील यशवंतराव महाराज पटांगणावर आयोजित वसंत व्याख्यानमालेत ‘सध्याची सामाजिक व राजकीय स्थिती’ या विषयावर ते बोलत होते. व्याख्यानास नानासाहेब राजेबहादूर, निशिकांत राजेबहादूर आदी उपस्थित होते. या वेळी गांधी यांनी स्वातंत्र्यानंतर घसरलेल्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीला केवळ नागरिकच जबाबदार असल्याचे म्हटले. नागरिकांच्या या वृत्तीमुळे सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळला असून, राजकीय लोकांचा स्वैराचार वाढला आहे. घडणाऱ्या घडामोडींवर कोणत्याही यंत्रणेचे नियंत्रण राहिलेले नाही. शिक्षणाच्या बाबतीत आपल्याकडे फारसे आशादायक चित्र नाही. केवळ २० टक्के मुले ही उच्च शिक्षणापर्यंत पोहोचत आहेत. सकल घरगुती उत्पन्नाच्या तुलनेत त्यासाठी एक टक्क्य़ापेक्षाही कमी अनुदान उपलब्ध करून दिले जाते. आरोग्य क्षेत्रही याला अपवाद राहिलेले नाही. संरक्षण क्षेत्रात नेमकी काय स्थिती आहे याचाही आपल्याला अंदाज नाही. सैनिकांची क्षमता ही जमेची बाजू असली तरी शस्त्रास्त्रांची क्षमताही तपासून पहायला हवी. उगाचच चीन विरुद्ध आपण दंड थोपटले पाहिजे, असे म्हणण्यात अर्थ नाही.
अंतर्गत आणि बाह्य़ संकटांनी देश ग्रासलेला असताना जातीयवाद, भ्रष्टाचार, माओवाद यांसारख्या संकटांनाही तोंड द्यावे लागत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी सरकारला जाब विचारायचे सोडून, भ्रष्टाचार आणि तो करणाऱ्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्यात येत आहे. जोपर्यंत सामान्य नागरिक प्रत्येक कृतीबद्दल सरकारला जाब विचारत नाही, चांगल्या उपक्रमांमागे ठामपणे उभा राहात नाही तोवर देशाची परिस्थिती सुधारणार नाही, असेही ते म्हणाले.
चंद्रशेखर शाह यांनी स्वागत केले. श्रीकांत बेणी यांनी सूत्रसंचालन केले. हिरालाल परदेशी यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. प्रा. कृष्णा शहाणे यांनी आभार मानले.