20 January 2018

News Flash

स्वामी विवेकानंद जन्माच्या सार्धशताब्दीनिमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

स्वामी विवेकानंदांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्षांच्या (सार्ध शताब्दी) निमित्ताने स्वामी विवेकानंद १५० वी जयंती उत्सव समिती आणि विवेकानंद केंद्र,

प्रतिनिधी | Updated: November 28, 2012 11:39 AM

 स्वामी विवेकानंदांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्षांच्या (सार्ध शताब्दी) निमित्ताने स्वामी विवेकानंद १५० वी जयंती उत्सव समिती आणि विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी (महाराष्ट्र प्रांत) यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १२ जानेवारी २०१३ ते १२ जानेवारी २०१४ या कालावधीत संपूर्ण देशभरात स्वामी विवेकानंदांचे विचार पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘हे भारत जागा हो, जगाला उजळून टाक’ या संकल्पनेवर आधारित हे कार्यक्रम असल्याची माहिती समितीचे सचिव प्रा. अनिरुद्ध देशपांडे यांनी सोमवारी मुंबईत पत्रकार परिषदेत दिली.
या निमित्ताने भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात कार्यक्रम आयोजित केले जाणार असून त्यासाठी देशातील सर्व राज्यात समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, आध्यात्मिक गुरू, स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा प्रसार करणाऱ्या विविध संस्था, संघटनांचे कार्यकर्ते यांचा समितीत समावेश आहे. आध्यात्मिक गुरू माता अमृतानंदमयी या समितीच्या अध्यक्ष तर डॉ. सुरेश कश्यप उपाध्यक्ष आहेत.
येत्या १२ जानेवारी रोजी देशातील प्रमुख शहरांमध्ये शोभायात्रा काढण्यात येणार असून १८ फेब्रुवारी रोजी देशभरातील शाळा आणि महाविद्यालयातून ‘सामूहिक सूर्यनमस्कार’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच स्वामी विवेकानंद यांच्या शिकागो येथील जगप्रसिद्ध भाषणाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ११ सप्टेंबर रोजी युवकांसाठी ‘भारत जागो दौड’चे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रा. देशपांडे यांनी सांगितले.
युवाशक्ती, संवर्धिनी, ग्रामायण, अस्मिता, प्रबुद्ध भारत आदी उपक्रमाअंतर्गत देशभरातील युवकांना राष्ट्रीय प्रवाहात सहभागी करून घेणे, सर्व सामाजिक क्षेत्रांत महिलांचा सहभाग वाढवणे, खेडय़ांच्या एकात्मिक विकासासाठी प्रयत्न करणे, देशाची संस्कृती आणि परंपरेचे जतन व संवर्धन करणे, बुद्धिजीवी आणि अभिजनांचा देशाच्या जडणघडणीतील सहभाग वाढवणे आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याची माहितीही प्रा. देशपांडे यांनी दिली.

First Published on November 28, 2012 11:39 am

Web Title: lots of programs arrenged all over india on swami vivekanand
  1. No Comments.