दीपावलीनंतरचे दिवस हे महाविद्यालयांसाठी मंतरलेले असतात. कुठे गॅदरिंगची तयारी, कुठे नाटय़ाविष्कार, तर कुठे विविध स्पर्धा. असे सर्व काही युवावर्गास हवेहवेसे वातावरण या दिवसांमध्ये तयार होते. त्यामुळे या दिवसांची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांच्या आनंदास आता पारावार उरलेला नसल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. विशेषत्वाने कॉलेज रोडवरील एसएमआरके महाविद्यालयातील विद्यार्थिनींचा उत्साह काही औरच असल्याचे चित्र सोमवारी ‘ग्रुप डे’ च्या निमित्ताने दिसले.
एसएमआरके महाविद्यालयाचे गॅदरिंग कार्यक्रमांमधील वैविध्यामुळे सदैव युवावर्गात आकर्षण ठरत आले आहे. यंदा तर सर्व कार्यक्रमांची जबाबदारी विद्यार्थिनींनीच शिरावर घेतल्याने एकप्रकारे ‘इव्हेंट मॅनेजमेंट’चे शिक्षण त्यांना आयतेच घेण्याची संधी प्राप्त झाली आहे. या संधीचे सोने करण्याचे विद्यार्थिनींनी ठरविले. प्रारंभी विषय निश्चित करण्यात आले. त्यानुसार कार्यक्रमाचे स्वरूप ठरविण्यात आले. जबाबदारीचे वाटपही करण्यात आले. विद्यार्थिनींनी ही जबाबदारी किती उत्कृष्टपणे पार पाडली, त्याचा प्रत्यय गॅदरिंगच्या पहिल्याच दिवशी आला.
सोमवारी सकाळी दहा वाजता पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनने गॅदरिंगला सुरुवात झाली. या कार्यक्रमात स्त्रीभ्रूण हत्या विरोध, जागतिकीकरण, साहित्याचे प्रकार या विषयांची मांडणी करण्यात आली. यामध्ये अमृता हिप्पळगावकरने प्रथम, राधिका चौधरीने द्वितीय, तर सायली आचार्यने तृतीय क्रमांक मिळविला. सकाळच्या थंडीत वैचारिक खुराकाने सुरुवात झालेल्या गॅदरिंगमध्ये नंतर ग्रुप डेने रंग भरला. महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थिनींचे विविधरंगी ग्रुप अक्षरश: विहरताना दिसत होते. प्रत्येक ग्रुपने एक नाव आणि त्यानुसार विशिष्ट पेहराव धारण केला होता. त्यामध्ये कोणी पाश्चात्य, कोणी मराठमोळी, कोणी ब्लॅक, कोणी व्हाइट अशा विविध प्रकारांची वेशभूषा केली होती. स्वच्छंदपणे विहरणाऱ्या या विद्यार्थिनींना दुपारी दोन वाजता थांबावे लागले. त्यानंतर दुपारी तीन वाजता वरिष्ठ पोलीस अधिकारी दिलीप निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत पालक मेळावा घेण्यात आला. हा मेळावा पालक आणि विद्यार्थिनी दोहोंसाठी उपयुक्त ठरला. निकम यांनी समाजातील गुन्हेगारी, सायबर गुन्हे याविषयी माहिती दिली. विद्यार्थिनींशी त्यांनी मुक्त संवाद साधला. भारतीय संस्कृतीला महत्त्व दिल्यास आणि त्याप्रमाणे मुलांवर संस्कार केल्यास गुन्हे कमी होण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले. या वेळी संगीत विभागाच्या वतीने समूहगीत सादर करण्यात आले.
सामाजिक विषयांकडे विद्यार्थिनी किती गंभीरपणे पाहतात, याचे दर्शन ‘पाणी वाचवा, जीवन वाचेल’ या पथनाटय़ाद्वारे दिसून आले. या वेळी प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे अध्यक्षस्थानी होत्या. प्रास्ताविक प्रा. अविराज तायडे यांनी केले. सूत्रसंचालन सायली आचार्य यांनी केले. आभार भारती सदावर्ते यांनी मानले.
गॅदरिंगची ही धम्माल २१ डिसेंबपर्यंत सुरू राहणार असून, या मालिकेतील पुढील अंक मंगळवारी ट्रॅडिशनल डेने रंगणार आहे, अशी माहिती प्रा. छाया लोखंडे यांनी दिली.