चातुर्वण्र्य व विषमतेविरूद्ध लढणाऱ्या परिवर्तनवादी व विद्रोही चळवळी मोडीत काढण्यासाठी प्रतिगामी शक्तींनी षडम्यंत्र रचले आहे. गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांनी मिळविलेला विजय हा त्याचाच एक भाग आहे. त्यामुळे त्याचा मुकाबला करण्यासाठी चळवळीतील कार्यकर्त्यांनी मतभेद बाजूला ठेवून संकटांचा मुकाबला करावा, विविध प्रवाहांनी एकत्र येऊन पॉवर तयार केली तर हे षडम्यंत्र मोडून काढता येईल, असे प्रतिपादन अकराव्या विद्रोही साहित्य व सांस्कृतिक संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. बाबूराव गुरव यांनी काढले.
राहुरी येथे आयोजित केलेल्या विद्रोही साहित्य व सांस्कृतिक संमेलनाच्या समारोपप्रसंगी गुरव बोलत होते. यावेळी विद्रोही साहित्य चळवळीचे अध्यक्ष पार्थ पोळके, वहारू सोनवणे, डॉ. धनाजी गुरव, एकनाथ आवाड, सत्यशोधक ओबीसी संघटनेचे अध्यक्ष हनुमंत उपरे, विकास मकदुम, के. डी. शिंदे, माजी आमदार गंगाधर पटणे, जालिंदर गिडे उपस्थित होते.
समारोपात बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, अखिल भारतीय साहित्य संमेलनाला सरकारने निधी देऊ नये, पंढरपूरच्या देवळातील बडवे, उत्पात यांच्याकडील विठ्ठलाची व्यवस्था काढून घेऊन वारकऱ्यांकडे द्यावी, सरकारी कार्यालयातील धार्मिक विधी बंद करावेत, बोधेगाव येथे अमर शेख यांचे, तर चिकणी येथे विठ्ठल उमाप यांचे स्मारक उभारावे, क्रांतीवीर राघुजी भांगरे व हनुमंत नाईक यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाचा सरकारने स्वीकार करून त्यांना इतिहासात त्याचा उल्लेख करावा आदी ठराव यावेळी करण्यात आले. महात्मा फुले यांना भारतरत्न राष्ट्रपिता म्हणावे, नक्षलवादाची व्याख्या सरकारने करावी, नक्षलवादाच्या नावाखाली चळवळीतील कार्यकर्त्यांना दिला जाणारा त्रास त्वरित थांबवावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
धनाजी गुरव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी पार्थ पोळके, एकनाथ आवाड, हनुमंत उपरे, गंगाधर जाधव यांची भाषणे झाली.  सुनील शिरसाठ यांनी सूत्रसंचालन, तर आभार मामा काळे यांनी मानले.