पावसाळय़ाच्या दिवसात शिकाऱ्यांच्या टोळ्या मोठय़ा प्रमाणावर सक्रिय होत असल्याने ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा ”मान्सून पेट्रोलिंग प्लान” तयार झाला असून यावर्षी प्रथमच व्याघ्र संरक्षणासाठी हत्तीची मदत घेतली जाणार आहे. ताडोबाच्या अतिसंवेदनशील व डोंगराळी भागात हत्तीचे तीन पथक तैनात करण्यात आले आहेत, तर विशेष व्याघ्र संरक्षण दलाचे तीन पथक व सीमावर्ती भागात सहा पथके गस्त घालणार आहेत.
दरवर्षी पावसाळय़ात १ जुलै ते ३० सप्टेंबर या तीन महिन्याच्या कालावधीत ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी बंद असतो. यंदाही या काळात प्रकल्प बंद असून पावसाळय़ात वाघ व इतर वन्यप्राण्यांच्या शिकारीचे वाढते प्रमाण लक्षात घेता ताडोबा व्यवस्थापनाच्या वतीने ”मान्सून पेट्रोलिंग प्लान” तयार करण्यात आलेला आहे. विदर्भात मागील दोन महिन्यात नऊ वाघांच्या शिकारी झाल्याचे समोर आले आहे. मध्यप्रदेशातील बहेलिया टोळीने या शिकारी केल्या आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच ताडोबा प्रकल्पातील मोहुर्ली वनपरिक्षेत्रात चितळाची शिकार करणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली होती. तसेच दोन वर्षांपूर्वीेच्या बोर्डा व सिंदेवाही येथील वाघाच्या शिकारीच्या घटना लक्षात घेता यावर्षी वन खात्याने मान्सून पेट्रोलिंग प्लान तयार करताना विशेष लक्ष दिले आहे.
आमच्या चंद्रपूर प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार ताडोबाच्या सीमावर्ती भागातून शिकारी कोअर व बफर झोनमध्ये एकाच वेळी प्रवेश करीत असल्याचे लक्षात घेऊन यावर्षी प्रथमच व्याघ्र संरक्षणासाठी हत्तीची मदत घेण्यात आलेली आहे. हत्तीच्या तीन पथकांच्या माध्यमातून पेट्रोलिंग व गस्त घातली जाणार आहे. या पेट्रोलिंगमध्ये तीन ताडोबातील हत्तींसह एक गार्ड व पाच वन मजूर राहणार आहे. ज्या भागात जिप्सी, गाडय़ा व पायदळ मनुष्य पोहचू शकत नाही, अशा अतिसंवेदनशील व डोंगराळ भागात हत्तीच्या पथकांच्या माध्यमातून संरक्षण केले जाणार आहे. विशेष करून सीमावर्ती भागात पथक सक्रिय राहणार आहे. यासोबतच विशेष व्याघ्र संरक्षण दलाचे तीन पथक गस्त घालणार आहेत. मोहुर्ली, ताडोबा व कोळसा अशा तिन्ही वनपरिक्षेत्रासोबतच बफर झोनमध्येही हे पथक गस्त करणार आहे. या एका पथकामध्ये २७ गार्ड व एका रेंजरचा समावेश राहणार आहे. कोअरचा एक व बफरचा दोन अशा तीन परिक्षेत्रांमध्ये एक पथक राहणार आहे. विशेष म्हणजे ही गस्त चोवीस तासाची राहणार आहे.
या दलामध्ये महिला कमांडोंचा समावेश सुध्दा करण्यात आलेला आहे. यासोबतच सीमावर्ती भागात सहा पथक सक्रिय राहणार आहेत. या पथकांचा आढावा प्रत्येक दिवशी वायरलेस व इतर संदेशवहनाच्या माध्यमातून घेतला जाणार असल्याची माहिती ताडोबा कोअरचे प्रभारी उपवनसंरक्षक गिरीष वशिष्ठ यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली. व्याघ्र संरक्षणासाठी हत्तीचा प्रथमच उपयोग होत असल्याने यावर्षी शिकाऱ्यांवर नियंत्रण मिळविता येईल, असेही ते म्हणाले. व्याघ्र प्रकल्पातील सुरक्षेचा आढावा तसेच पथकांच्या प्रगतीचा आलेख सहायक उपवनसंरक्षक दर्जाचा अधिकारी आठवडय़ातून एकदा घेणार आहे. तर उपवनसंरक्षक पंधरा दिवसातून एकदा व क्षेत्र संचालक दर महिन्याला आढावा घेणार आहेत. विशेष म्हणजे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यापासून तर सहायक उपवनसंरक्षक, उपवनसंरक्षक व क्षेत्र संचालक या सर्व अधिकाऱ्यांना आठवडय़ातून तीन ते चार वेळा ताडोबा भेट व आढावा सक्तीचे करण्यात आलेले आहे. वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला तर रात्रीची गस्त घालण्याचे निर्देश सुध्दा देण्यात आले आहेत. रात्रीच्या गस्तीसाठी विशेष व्यवस्था केली गेली असून त्यात पेट्रोलिंग लाईटपासून सर्व साधनसामग्री पुरविण्यात आलेली आहे. ताडोबा प्रकल्प बंद होण्यास आणखी पंधरा दिवसांचा कालावधी शिल्लक असला तरी गस्त व पेट्रोलिंगच्या कामाला सुरूवात झालेली आहे. या विशेष संरक्षणासोबतच ताडोबात नियमित संरक्षण करणारे गार्ड, वन कर्मचारी तसेच कमांडो सुध्दा तैनात राहणार आहेत.