मराठी चित्रपटसृष्टीत आता कात टाकली आहे. येथे नवनवीन प्रयोग होत आहेत, तरीही मराठी प्रेक्षकानेच मराठी सिनेमांकडे पाठ फिरवल्याची खंत ‘पिस्तुल्या फेम’ प्रसिध्द दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी येथे व्यक्त केली.
न्यू आर्टस महाविद्यालयाच्या संज्ञापन अभ्यास विभागाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय लघू व माहितीपट स्पर्धा आणि अहमदनगर चित्रपट महोत्सवाचे उदघाटन मंजुळे यांच्या आज हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या विश्वस्त दिपलक्ष्मी म्हसे होत्या. निर्माता निलेश नवलखा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे, विभागप्रमुख प्रा. बापू चंदनशिवे, अरूणा काळे आदी यावेळी उपस्थित होते. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात ३९ चित्रपटांचा समावेश आहे. श्रीमती म्हसे यांनी यावेळी बोलताना नेमका विरोधी सूर लावला. त्या म्हणाल्या, चित्रपटसृष्टीला शंभर वर्षांची परंपरा असली तरी आजचे थिल्लर चित्रपट पहाता या परंपरेला धक्का बसला आहे. पुर्वीसारखे कसदार, दर्जेदार, संहिताप्रधान चित्रपट आता तयारच होत नाहीत. नव्या पिढीच्या कलाकारांनी समाज प्रबोधनाला अधिक महत्व देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. प्रा. चंदनशिवे यांनी प्रास्तविक केले. डॉ. झावरे यांनी संस्थेच्या अभ्यासक्रमाची माहिती दिली. प्रा. संदिप गिऱ्हे यांनी आभार मानले.