मराठी नाटकांची परदेशवारी आता फारशी नावीन्यपूर्ण राहिलेली नाही. तब्बल १७ वर्षांपूर्वी ‘सुयोग’चे सुधीर भट मराठी नाटक लंडनला घेऊन गेले आणि त्यांनी इतिहास रचला. आता दरवर्षी कोणते ना कोणते नाटक या इतिहासाची पुनरावृत्ती करीतच असते. यंदा तो मान ‘ग्रेट मराठा एण्टरटेन्मेण्ट’, ‘अश्वमी थिएटर्स’ आणि ‘अनामय’ यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मिती केलेल्या ‘ऑल द बेस्ट – द म्युझिकल’ या नाटकाला मिळाला आहे. यंदा दिवाळीच्या मुहूर्त साधून कुवेतमध्ये या नाटकाचे प्रयोग सादर करण्यात आला.
आंधळा, बहिरा आणि मुका असलेल्या तीन मित्रांचे एकाच मुलीवर जडलेले प्रेम आणि त्यातून उडणारी धम्माल यावर आधारित या नाटकाने काही वर्षांपूर्वी लोकप्रियतेचा कळस गाठला होता. भरत जाधव, संजय नार्वेकर आणि अंकुश चौधरी यांच्या सहजसुंदर अभिनयाने ‘ऑल द बेस्ट’ या नाटकाने प्रेक्षकांच्या मनात आगळे स्थान निर्माण केले होते. त्यानंतर यंदा ‘ग्रेट मराठा एण्टरटेन्मेण्ट’, ‘अश्वमी थिएटर्स’ आणि ‘अनामय’ यांनी एकत्र येत हे नाटक नव्या संचात आणि नव्या रूपात प्रेक्षकांसमोर आणले. मयुरेश पेम, आदिनाथ कोठारे, वैभव तत्त्ववादी आणि मनवा नाईक ही चौकडी या नाटकात भूमिका साकारत आहेत.
दिवाळीच्या निमित्ताने या नाटकाचे प्रयोग कुवेतमध्ये करता येतील का, अशी विचारणा तेथील महाराष्ट्र मंडळाने केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत ‘ऑल द बेस्ट – द म्युझिकल’ची टीम कुवेतवारीला गेली. कुवेतमधील प्रेक्षकांनीही या नाटकाला उत्तम प्रतिसाद दिल्याची माहिती या टीमने दिली.