सभागृहाचे कामकाज सुरू असताना मोबाईलवर बोलणे शिस्तीला धरून नाही. मी सर्वच पक्षाच्या नगरसेवकांना सांगत आहे. माझ्यावर मोबाईल जप्त करण्याची वेळ आणू नका, अशा शब्दांत महापौर सुनील प्रभू यांना सभागृहातील बेशिस्त नगरसेवकांना समज देण्याची वेळ आली.
मुंबई महापालिका सभागृहात निम्म्याहून अधिक नगरसेवक हे नवीन असून त्यांनी सभागृहाच्या प्रथा-परंपरांचे पालन करून त्याचप्रमाणे अभ्यासपूर्ण भूमिका मांडणे अपेक्षित असल्याचे ज्येष्ठ नगरसेवकांचे म्हणणे आहे. दुर्दैवाने नवीन नगरसेवक हे पालिका कायदा, कामकाजाची पद्धत तसेच विविध समित्यांचे विषयही वाचत नाहीत. महापालिका सभागृहात मुंबईच्या त्यातही आपल्या मतदारसंघातील प्रश्न मांडून अभ्यासपूर्ण चमक दाखवण्याची संधी असत,े मात्र बहुतेक नवीन नगरसेवक हे सभागृहात असताना मोबाईलवर बोलण्यातच धन्यता मानताना दिसतात. यातूनच अस्वस्थ झालेल्या महापौर प्रभू यांनी ‘राष्ट्रवादी’चे गटनेते धनंजय पिसाळ हे मोबाईलवर बोलत असताना त्यांना तसेच सभागृहातील अन्य नगरसेवकांना समज दिली. सभागृहाचे कामकाज सुरू असताना मोबाईल बंद ठेवा अन्यथा सभागृहाबाहेर जाऊन बोला, असा इशाराही त्यांनी दिला. माझ्यावर तुमचा मोबाईल जप्त करण्याची वेळ आणू नका, असे सांगून शिस्त पाळण्याचे आवाहन महापौरांनी केले.