भाषा ही नदीसारखी असते. वाहतांना दोन्ही तिरावरील लोकांना देत-घेत जाते. फार पूर्वी संत साहित्यिकांनी कीर्तन, भजन, भारूड, अभंगच्या माध्यमातून मराठी भाषेला घडविले. ९० च्या दशकानंतर डब्ल्युटीओ आला. जागतिकीकरणाची सुरुवात झाली आणि देशाचे वातावरणच बदलत गेले. पूर्वी मुलांना ऱ्हस्व-दिर्घच्या ज्ञानाकरिता वर्तमानपत्र वाचायला पालक सांगत. त्यावेळी भाषेत शुद्धता होती, पण जागतिकीकरणाच्या काळात स्पर्धेत वाढ झाली. घटना घडल्यानंतर अवघ्या काही तासातच बातमी तयार करीत असतांना कर्ता, कर्म, क्रियापद याकडे कानाडोळा होत गेला. माध्यम प्रतिनिधींना सगळे विषय हाताळायचे असतात आणि यात सगळेच विषयांवरील प्रतिभावंत असतात, असे नाही. स्पध्रेच्या युगात प्रत्येकाला आपला माल विक्री करायचा आहे. यात टिकण्याकरिता ध्येयवाद बाजूला ठेवावे लागतात. सिलीकॉन व्हॅलीत अभिजात्य वर्ग गेला आणि भाषेचे वाटोळे झाले. सध्या तर काही वर्तमानपत्रांमध्ये मेंन्गलीश भाषेचा वापर सर्रास सुरू आहे. हा दीर्घ चिंतनाचा विषय असल्याचे प्रतिपादन वक्त्यांनी केले.
विदर्भ साहित्य संमेलनात ‘प्रसार माध्यमांनी मराठी भाषा किती घडवली? बिघडवली किती?’ या विषयांवरील परिसंवादात अमरावतीचे शिवराय कुलकर्णी म्हणाले, पूर्वी माध्यमांच्या प्रतिनिधींकरिता कार्यशाळेच्या माध्यमातून काळजी घेतली जात होती. १९९० च्या पूर्वीच्या काळाने भाषा घडविण्याचे कार्य केले, पण आता माध्यमांना दोष दिला जात आहे. आज प्रसारमाध्यमांचे स्वरूप बदलले आहे. पूर्वी संपादकांच्या नावावरून वर्तमानपत्र ओळखले जायचे, पण आज वाचकांना संपादकांचे नाव माहिती नसते. पूर्वी वर्तमानपत्रांचे धोरण संपादक ठरवित. आज व्यवस्थापन संपादकांवर वरचढ झालेले आहेत. व्यवस्थापन जसे म्हणेल तसे धोरण ठरविले जात आहे. सोशल मिडियाने तर फेसबुकवर आपली एक वेगळीच भाषा निर्माण केली आहे. व्यावसायिकरण आम्ही स्वीकारले. समाजाला जे आवडते ते देण्याचा माध्यमही प्रयत्न करतात.यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून श्रीपाद अपराजित, भरवी देशपांडे, माधुरी साकुळकर, शिवराय कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन मनोहर नरांजे यांनी, तर आभार सीमा व्यवहारे यांनी मानले.