सांगली महापालिकेचे महापौर निवडण्यासाठी बुधवारी (दि. १४ )नवनिर्वाचित सदस्यांची बैठक बोलाविण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी महापौर निवडीचा कार्यक्रम सोमवारी जाहीर केला.
सांगली महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ७८ पकी ४१ जागा जिंकून काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. ३ अपक्ष नगरसेवकांनी पािठबा दिल्याने नव्या महापालिकेत काँग्रेसचे संख्याबळ ४४ झाले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला १९ जागा मिळाल्या असून ६ अपक्षांनी पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादीचे संख्याबळ २५ झाले आहे.  भारतीय जनता पक्ष मुख्य घटक असलेल्या स्वाभिमानी विकास आघाडीला ८ जागा मिळाल्या आहेत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला २ जागा मिळाली आहे.
सांगलीचे महापौरपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित असून या पदासाठी काँग्रेस पक्षात चौघांची दावेदारी आहे. महापालिकेतील काँग्रेसचे गटनेतेपद किशोर जामदार यांच्या रुपाने मिरजेला दिले गेल्याने महापौरपदाची संधी सांगलीला मिळण्याची शक्यता राजकीय सूत्रांकडून व्यक्त होत आहे.