म्हैसाळ योजनेचे पाणी गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या कवठेमहांकाळ मतदार संघात पोहोचण्यापूर्वीच शेतक-यांच्या अल्प प्रतिसादामुळे बुधवारी जलसंपदा विभागाने पाण्यात कपात केली. २५ हजार हेक्टरची मागणी अपेक्षित असताना अवघ्या ३०० हेक्टर क्षेत्रासाठी शेतक-यांनी पाणी मागणी नोंदविल्यामुळे या योजनेचे भवितव्य अधांतरी आहे.
गेल्या वर्षी सोडण्यात आलेल्या पाण्याचे वीजबिल सुमारे ७ कोटी रुपये आले होते. या बिलाची तरतूद शासनाने टंचाई निधीतून केली. त्यामुळे खंडित करण्यात आलेला म्हैसाळ योजनेचा वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला. म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्यात यावे यासाठी राजकीय मंडळी आग्रही आहेत. गृहमंत्री आर.आर.पाटील यांनीही म्हैसाळ योजना सुरू करण्याचे आदेश दिले.
जलसंपदा विभागाने दि. २ जानेवारीपासून म्हैसाळ योजनेचे पंप सुरू केले.  त्याचबरोबरच ७ जानेवारीपासून पहिले आवर्तन सुरू होत असून शेतक-यांनी ५० टक्के आगाऊ रकमेसह पाणी मागणी अर्ज भरून द्यावेत असे आवाहन केले होते. मात्र मिरज तालुक्यातील लाभार्थी शेतक-यांकडून अपेक्षित प्रतिसाद पाणी मागणीसाठी मिळाला नाही. तालुक्यातील आरग, बेडग, बेळंकी, लिंगनूर, मालगाव या गावातून अवघ्या ३०० हेक्टर क्षेत्राची मागणी नोंदली गेली. कवठेमहांकाळ, तासगांव आणि जत तालुक्यातून अद्याप पाण्याची मागणीच आलेली नाही. त्यामुळे बुधवारपासून पहिल्या टप्प्यात सुरू असणा-या पंपांची संख्या ४ वरून एक करण्यात आली आहे.  याशिवाय नरवाड येथील दुस-या पंपगृहामध्ये एक, आरग पंपगृहात एक आणि लांडगेवाडी येथील पंपगृहात एक असे पंप सुरू ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक ठिकाणी १४०० अश्वशक्तीचे पंप आहेत.  पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने कालव्यातील पाण्याची गतीही थंडावली आहे.