News Flash

मीरा रोडही आवाक्याबाहेर;आता वसई-विरारच!

मुंबईत एककाळ होता तेव्हा दहिसपर्यंत परवडेल असे घर मिळू शकत होते. परंतु आता तर दहिसरलाही बोरिवलीचा भाव येऊ लागला आहे. त्यामुळे मुंबईकर मीरा रोडपर्यंत

| January 22, 2013 11:38 am

मुंबईत एककाळ  होता तेव्हा दहिसपर्यंत परवडेल असे घर मिळू शकत होते. परंतु आता तर दहिसरलाही बोरिवलीचा भाव येऊ लागला आहे. त्यामुळे मुंबईकर मीरा रोडपर्यंत कधीच सरकले होते. परंतु आता मीरा रोडही आवाक्याबाहेर जाऊ लागल्याने वसई-विरारशिवाय पर्याय नाही, असे वाटून मध्यमवर्गीय मुंबईकर गेल्या काही वर्षांपासून या पट्टय़ाकडे सरकू लागले आहेत. या पट्टय़ात गेल्या वर्षभरात नव्या मालमत्ता खरेदी करणाऱ्यांची संख्या तब्बल ३० ते ४० टक्क्य़ांनी वाढली आहे. विशेष म्हणजे ही सर्व मंडळी मुंबई शहर वा उपनगरात कुठेतरी राहत होती. मुंबईतच हक्काचे घर असावे, असे त्यांना वाटत होते. परंतु जागांच्या वाढत्या किंमती आणि बजेट पाहता त्यांना ते शक्य होत नव्हते.
वसई-विरार पट्टय़ाचे महत्त्व लक्षात घेऊन आता तेथील सरकारी यंत्रणाही जोरदार कामाला लागल्याचे चित्र आहे. एककाळ असा होता की, वसई-विरार पट्टय़ात घर घ्यायचे म्हणजे गैरसोयींना तोंड द्यायचे. परंतु गेल्या काही वर्षांत हा समजही दूर होऊ लागला आहे. मोठे रस्ते, पाण्याची मुबलक उपलब्धता, वाहतूक व्यवस्थेत हळूहळू सुधारणा होत असल्याचा दावा केला जात आहे. आता या मार्गावर परवडणाऱ्या घरांचे दरही आता तीन ते चार हजार रुपये प्रति चौरस फुट इतके झाले आहे. हाच दर काही वर्षांपूर्वी नवशे ते हजार होता. काशिमिरा येथील उड्डाणपुल झाल्यानंतर मीरा रोडमध्येच सहा ते सात हजार प्रतिचौरस फूट दर झाल्याने हे मुंबईकर आता वसई-विरार पट्टय़ात स्थिरावू लागले आहे. याचाच फायदा उठवीत अनेक बिल्डरांनी सोयीसुविधांचे आमीष दाखवीत या मध्यमवर्गीयांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला आहे. पश्चिम मार्गावर वसई-विरार म्हणजे अगदीच टोकाचे ठिकाण. पण महानगरपालिका क्षेत्र झाल्यानंतर आता हे चित्र बदलत असून मुंबईत घर परवडत नसलेल्या मध्यमवर्गीयांसाठी आणि बिल्डरांसाठीही वसई-विरार परिसर गृहबांधणीच्या क्षेत्रातील ‘हॉट डेस्टिनेशन’ ठरत आहे.
मुंबईत जागा परवडत नसलले मध्यमवर्गीय १९८०-९० च्या दशकात बोरिवली-दहिसरकडे सरकले. पण हळूहळू तो परिसरही इतका वाढला की तेथील जागांचे दर मुंबईतील जागांच्या दरांशी स्पर्धा करू लागले. त्यामुळे गेल्या काही वर्षांत मुंबईच्या वेशीवर असलेल्या या भागाचे दरही सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आणि मिरा-भाईंदर, नालासोपाराकडे पावले वळली. पण वसई-विरार महानगरपालिका जाहीर झाली आणि पश्चिम मार्गावर मध्यमवर्गीयांसाठी आता वसई-विरार पट्टा हा मोठय़ाप्रमाणात वाढत आहे. महानगरपालिका होण्याच्या आधी वसई परिसरात सुमारे दीड ते दोन हजार रुपये प्रति चौरस फूट या दराने घरांची विक्री होत होती. पण गेल्या तीन वर्षांत दर लक्षणीय प्रमाणात वाढले. वसई स्थानक परिसरात पाच हजार रुपयांच्या आसपास गेला आहे. विरारमध्ये चार हजार रुपये प्रति चौरस फुटापर्यंत दर गेला आहे. त्यामुळे मोठ मोठे बिल्डर मोठाले गृहसंकुल बांधण्यासाठी वसई-विरार पट्टय़ाची निवड करताना दिसत आहेत. क्लब हाऊस, जलतरण तलाव असलेली मोठी गृहसंकुले ही मुंबई- ठाण्याची मिरासदारी होती. आता वसई-विरार पट्टय़ातही अशा सर्व सुविधांनी युक्त मोठी गृहसंकुले उभी राहत आहेत. गृहनिर्माण संकुलाबरोबरच रो हाऊस, छोटे बंगले अशा प्रकल्पांच्या जाहिरातीही मोठय़ाप्रमाणात सुरू आहेत.

म्हाडाचीही घरे!
सर्वसामान्यांसाठी घरे बांधण्याची जबाबदारी असलेल्या ‘म्हाडा’चेही लक्ष आता मुंबईलगतचा वाढत जाणारा भाग म्हणून वसई-विरारपट्टय़ाकडे आहे. या वर्षी मे महिन्यात अपेक्षित असलेल्या ‘म्हाडा’च्या सोडतीत मुंबईपेक्षा वसई-विरार पट्टय़ातील घरांची संख्या अधिक असणार आहे. विरार येथे एकूण २ हजार ४८६ घरे ‘म्हाडा’ बांधत असून त्यासाठी सोडत निघेल. त्यात एक  हजार ८३६ घरे अल्प उत्पन्न गटासाठी तर ६५० घरे मध्यम उत्पन्न गटासाठी असणार आहेत. ‘म्हाडा’च्या वसाहतींमुळे सामान्य माणसाला या भागात घर घेण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नजीकच्या काळात वसई-विरार पट्टा आणखी फोफावणार असे चित्र आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2013 11:38 am

Web Title: mira road out of budget now vasai virar
Next Stories
1 आता वरळी-शिवडी उन्नत मार्गाची तयारी!
2 विकास निधीतील ‘टक्के’वारीसाठी आता नगरसेवक सरसावले!
3 दुर्ग दुर्घट भारी!
Just Now!
X