शहरातील दैनंदिन स्वच्छतेसाठी आराखडा तयार करून त्याची सोमवारपासून (दि. २७) त्याची अंमलबजावणी करावी तसेच स्वच्छतेसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ‘टिम वर्क’ पद्धतीने काम करावे, अशी सूचना महापौर संग्राम जगताप यांनी केली. महापालिकेच्या आरोग्याधिकाऱ्यांनी व प्रभाग अधिकाऱ्यांनी रोज पाहणी करून स्वच्छतेबाबत आढावा घेण्याची सूचनाही त्यांनी केली.
शहरातील आरोग्य व स्वच्छतेबाबत आढावा घेण्यासाठी महापौर जगताप यांच्या अध्यक्षतेखाली मनपामध्ये बैठक झाली. उपायुक्त संजीव परशरामी, उपआरोग्याधिकारी पैठणकर, यंत्र अभियंता परिमल निकम, प्रभाग अधिकारी सोनवणे, रणदिवे, दिवाण, मुख्य स्वच्छता निरीक्षक अन्वर शेख तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
न्यायालयाकडून कायम करण्यात आलेले कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर त्याजागी पर्यायी कामगार मिळत नाहीत, वाढत्या शहरीकरणाच्या तुलनेत मनुष्यबळ कमी पडते याकडे प्रशासनानने लक्ष वेधले. त्यावर आरोग्य विभागाकडील अनुकंपा तत्त्वावर नोकर भरती लवकर करावी, कामगार कमी पडल्यास कंत्राटी कामगार नियुक्त करण्यास महापौरांनी बजावले. बैठकीत शहर स्वच्छतेचा समूह आराखडा सादर करण्यात आला. आरोग्य विभागाने तयार केलेल्या आराखडय़ानुसार प्रभागातील दैनंदिन स्वच्छतेसह दुपारच्या सत्रात कामगारांचा एकत्रित समूह तयार करून सोमवारपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. यात बांधकाम व उद्यान विभागावरही जबाबदारी सोपवण्यात आली.
स्वच्छतेसाठी वापरली जाणारी वाहने सुस्थितीत ठेवणे, सार्वजनिक स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता ठेवणे, जंतुनाशक फवारणी करणे याबाबतही महापौरांनी सूचना केल्या.