वैशाली आणि गणेश. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले. तासन्सात फोनवर गप्पा मारत असायचे. सगळ्यांनाच हे माहीत होतं. पण ११ जुलै रोजी दुपारी अचानक गणेशने वैशालीचा फोन उचलणे बंद केले. तासभर त्याने तिचे फोन उचललेच नाहीत. त्या तासाभरात तिने त्याला किमान पन्नास फोन केले. तो फोन उचलून कट करायचा. भांडण नाही, वाद नाही, कुठे बिनसलं नाही. मग तरी गणेश आपला फोन कट का करतोय, हे तिला समजत नव्हतं. ती अस्वस्थ होती. परंतु नंतर ‘मी कामात होतो’, असे सांगून गणेशने तिची समजूत काढली. ती पण झालेला प्रकार विसरली. पुन्हा सर्व सुरळीत सुरू झालं. पण गणेशचे हे फोन न उचलणे त्याला काही दिवसांनी तुरुंगात टाकणार आहे, याची दोघांनाही कल्पनाच आली नाही. त्याने वैशालीची जरी समजूत काढली तरी गुन्हे शाखेच्या पोलिसांना तो ‘समजावू’ शकला नाही. त्यातूनच उलगडा झाला डॉक्टरच्या घरातील २५ लाखांच्या दरोडय़ाचा. प्रेमी जोडप्यात निर्माण झालेला अबोला हाच धागा पकडून गुन्हे शाखा ८ ने हा गुन्हा उघडकीस आणला. ‘ह्य़ुमन इंटेलिजन्स’चे हे उत्तम उदाहरण ठरावं.
शुक्रवार, ११ जुलै. जोगेश्वरीत राहणारे एक डॉक्टर सकाळी रुग्णालयात नेहमीप्रमाणे काम करत होते. त्याच इमारतीत त्यांचे घरसुद्धा आहे. घरी आई-वडील आणि पत्नी असते. त्या दिवशी त्यांची बहीण त्यांना भेटायला आली होती. सकाळच्या शस्त्रक्रिया करून ते दुपारी कामानिमित्त बाहेर गेले होते. साधारण ४.०० च्या सुमारास दारावरची बेल वाजली. पार्सल देण्यासाठी कुरियवरवाला दारात उभा होता. डॉक्टरांच्या पत्नीने दार उघडताच बाहेर लपून बसलेले पाचजण आत शिरले. झपाटय़ाने त्यांनी घरातील सगळ्यांचे हातपाय बांधले. तोंडात कापडी बोळा कोंबला आणि मग आरामात घरातील २० लाखांची रोख रक्कम आणि ५ लाखांचे दागिने असा ऐवज लुटून नेला.
प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलीस आयुक्तांनी हा तपास गुन्हे शाखा ८ कडे सोपवला. पण कसलाच दुवा हाती लागत नव्हता. ज्या प्रकारे कुरियर बॉय बनून आरोपी घरात शिरले हे पाहता त्यांना सर्व माहिती होती. त्यामुळे एखादी माहीतगार व्यक्ती कटात सामील असेल, असा अंदाज होता.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फटांगरे आणि पोलीस निरीक्षक पंढरीनाथ व्हावळ यांनी डॉक्टरांच्या रुग्णालयात काम करणाऱ्या सर्वाची कसून चौकशी केली. तरी काहीच हाती लागत नव्हते. मग त्यांनी प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मोबाईलचा सीडीआर (मोबाईल कॉल्सचे तपशील) तपासला. गणेश सावंत (३३) याचा सीडीआर त्यांना संशयास्पद वाटला. प्रत्येक दहा मिनिटात तो वैशाली (नाव बदललेले) या तरुणीला फोन करीत असल्याचे दिसत होते. दिवसभरात ते अनेकदा बोलत असत. प्रत्येक वेळी गणेशच तिला फोन करीत होता. पण ११ जुलै रोजी संध्याकाळी ३ ते ५ या काळात त्याने तिला एकदाही फोन केला नाही. उलट वैशालीच त्याला फोन करत होती. पण त्याने एकदाही फोन उचलला नाही. प्रत्येक वेळी तो फोन कट करत होता.
वैशाली त्याला सतत फोन करतेय आणि तो फोन उचलत नव्हता हीच बाब आम्हाला संशयास्पद वाटली, असे दीपक फटांगरे यांनी सांगितले. तो एवढा का बिथरला होता याचे कुतूहल वाटले. मग आम्ही  हाच धागा पकडून सखोल चौकशी सुरू केली. आम्ही आधी वैशालीला विचारले. पण तिने सांगितले ऑपरेशन सुरू असल्याने गणेश बिझी होता. नंतर आमचे बोलणे व्यवस्थित सुरू आहे. पोलिसांनी मग गणेशकडे मोर्चा वळवला. ऑपरेशन सकाळीच होते. दुपारी डॉक्टरच नव्हते. मग संशय बळावला. गणेशला ‘बोलते’ केले आणि पटापट माहिती मिळू लागली.
गणेशनेच आपल्या साथीदारांना डॉक्टरांच्या घराची माहिती देऊन दरोडय़ाची योजना बनविली होती. चार ते चाडेचारच्या दरम्यान हा दरोडा पडला. तेव्हा तो रुग्णालयात होता. त्यामुळेच तो वैशालीचे फोन घेत नव्हता हे उघड झाले. पोलिसांनी गणेशला अटक केली. पण त्याचे साथीदार फरार होते. हा दरोडा कु ख्यात अमर नाईक टोळीतील गुंड सुधीर शिंदे (४३) याने घडवला होता.
पोलीस निरीक्षक पंढरीनाथ व्हावळ, राजू कसबे, सुनील माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीशचंद्र राठोड, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत जोशी, मधुकर पाटील आदींनी मग शिंदे आणि त्याच्या टोळीला पकडण्यासाठी सापळा लावला. अंधेरी येथून सुधीर शिंदे याच्यासह त्याचे साथीदार प्रवीण सावंत, साहिल शेख, राकेश पालव, सूर्यकांत म्हसणे आदींना अटक केली. सुधीर शिंदे याच्यावर खंडणी, चोरी, हत्या आदी २१ गुन्हे आहेत.
मोबाईलच्या सीडीआरद्वारे अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. पण अशा पद्धतीने केवळ संशयावरून गुन्हा उघडकीस आणण्याचे हे अनोखे उदाहरण ठरावे. त्यामुळे आयुक्तांनी गुन्हे शाखा ८ च्या संपूर्ण पथकाचं खास कौतुक केलं आहे.