दिवंगत गायक मोहंमद रफी यांच्या पस्तीसाव्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने त्यांच्या गाण्यांच्या स्मरणरंजनाची अनुभूती रफी यांच्या चाहत्यांना आणि रसिकांना घेता येणार आहे. ‘जीवनगाणी’ निर्मिती आणि ‘लोकसत्ता’प्रस्तुत ‘फिर रफी’ या कार्यक्रमाचे प्रयोग ३० जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आले आहेत. ‘फिर रफी’ चा पहिला प्रयोग ३० जुलै रोजी बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहात होणार आहे. यानंतर ३१ जुलै रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन तर १ ऑगस्ट रोजी विलेपार्ले येथील दीनानाथ नाटय़गृहात प्रयोग होणार आहेत. शेवटचा चौथा प्रयोग २ ऑगस्ट रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिर येथे होणार असून त्याचे निवेदन संदीप कोकीळ यांचे आहे. तर वाद्यवृंद संयोजन देवा व किरण यांचे आहे. या चारही ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांची वेळ रात्री साडेआठ अशी आहे. गायक श्रीकांत नारायण हे रफी यांची गाणी सादर करणार असून सरिता राजेश या त्यांना साथ देणार आहेत. ‘फिर रफी’ हा कार्यक्रम गेली सात वर्षे सादर होत असून यंदा कार्यक्रमाचे आठवे वर्ष आहे. कार्यक्रमाची लोकप्रियता वाढत असून या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच रफी यांचे कुटुंबीय उपस्थित राहात असल्याची माहिती ‘जीवनगाणी’चे प्रसाद महाडकर यांनी दिली.