शिवजयंतीनिमित्त हिंदू एकता आंदोलन व रिक्षा संघटनेतर्फे सालाबादप्रमाणे घेण्यात आलेल्या ‘रिक्षा सुंदरी’ स्पध्रेत कराडच्या विशाल मोहन पवार यांच्या एमएच ११ एजी ६९१ क्रमांकाची २००८ सालचे मॉडल असलेली रिक्षा प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. दरम्यान, एमएच १० के. १६३४ या रिक्षावर चालकाने चाकावर रिक्षा वळवणे व इतर केलेल्या कसरती कराडकरांची वाहवा मिळवून गेली. या वेळी हिंदू एकता व रिक्षा संघटनेचे पदाधिकरी व कार्यकर्त्यांसह कराडकरांनी गर्दी केली होती.  
सातारा येथील मुश्ताक पेंटर यांच्या १९८४ मॉडेलच्या एमपीक्यू ७६७७ या २९ वर्षे जुन्या रिक्षाने द्वितीय क्रमांक पटकावला. सातारच्याच बहाफीस मेस्त्री यांच्या १९९५ मॉडेलच्या एमएच ११ एक्यू ५६४ या रिक्षाने तृतीय क्रमांक पटकावला. सातारा येथील गणेश शिंदे यांच्या रिक्षाला चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक देण्यात येणार आहे. शिवजयंतीनिमित्त निघणारी दरबार मिरवणूक सायंकाळी उशिरा दत्त चौकात विसावल्यानंतर प्रथेप्रमाणे होणाऱ्या कार्यक्रमात या पारितोषिक विजेत्या रिक्षाचालकांचा बक्षिसांसह यथोचित गौरव करण्यात येणार आहे.
दिवंगत लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीसमोरील व कृष्णा घाटावरील मोकळय़ा रस्त्यावर रिक्षा सुंदरी स्पर्धा व दोन चाकांवर रिक्षा चालविण्याच्या कसरती पार पडल्या. रिव्हर्स रिक्षा चालवणाऱ्या सांगली येथील चालाकांचे शहरात चित्तथरारक दर्शन घडवले. ‘रिक्षा सुंदरी’ स्पध्रेनिमित्त त्याने येथे कसरती करून दाखविल्या. शहरातील बाजारपेठेतही रिव्हर्स रिक्षा चालवून नागरिकांना आश्चर्यचकित केले. याशिवाय दोन चाकांवरही त्याने रिक्षा चालवून दाखवून स्वतंत्र केलेल्या कसरती लोकांना अचंबित करणाऱ्या ठरल्या.