आधीच्या १० जणांना जामीन नाकारला
अपंगत्वाची बनावट प्रमाणपत्रे
प्रशासकीय बदल्या टाळण्यासाठी अपंगत्वाचे बनावट प्रमाणपत्र सादर करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या ३४ प्राथमिक शिक्षकांना आज कोतवाली पोलिसांनी अटक केली. त्यातील ६ जण स्वत:हून न्यायालयापुढे हजर झाले, त्यांना दि. १६ पर्यंत, तर पोलिसांनी अटक केलेल्या २८ जणांना दि. १८ पर्यंत तपासासाठी पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. अटक केलेल्यांमध्ये १६ शिक्षिका आहेत. दरम्यान, पूर्वी अटक झालेल्या, परंतु सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या १० शिक्षकांचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने आज फेटाळला. आज अटक केलेल्यांमध्ये शिक्षक संघटनेच्या नेत्यांचाही समावेश आहे.
बनावट प्रमाणपत्र दाखल करणाऱ्या एकूण ७६ प्राथमिक शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोतवाली पोलिसांनी आज शैला दुधाडे, रत्नबाई ठुबे, पुष्पा ठुबे, दिनकर ढोकळे, आशा रेपाळे, आशा वैद्य, कमल खणकर, उषा बनकर, स्नेहलता सुंदरे, प्रमिला दाते, आबा नवले, मारुती खोसे, बाबूराव झावरे, प्रकाश गोरडे, बबन शिंदे, ज्ञानेश्वर मावळे, रामदास गाढवे, सुंदर झावरे, सोपान राऊत, राजेंद्र दाते, आशा पायमोडे, भास्कर दाते, सुनिल झावरे, अलका खोडदे, गंगू झावरे, संतोष हारदे, राधा पठारे, रेवणनाथ चेमटे या २८ जणांना अटक केली. यातील बहुसंख्य पारनेर तालुक्यातील रहिवासी आहेत. न्यायालयाने त्यांना दि. १८ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. त्यांच्या वतीने वकील विवेक म्हसे यांनी बाजू मांडली, तर सरकारतर्फे सरकारी वकील संगीता ढगे व तपासी अधिकारी, पोलीस निरीक्षक अभिमन पवार यांनी बाजू मांडली.
दरम्यान, श्रीगोंदे तालुक्यातील संगीता टोणपे, सरला गावडे ऊर्फ सुद्रिक, सुवर्णा मोहोळकर, वैशाली लोंढे, रोहिणी डोमे व गोरख धस हे सहाजण न्यायालयापुढे हजर झाले. त्यावर न्यायालयाने पोलिसांकडे विचारणा केली, पोलिसांनी आरोपींचा ताबा मागितला. सरकारतर्फे वकील ढगे व आरोपींच्या वतीने वकील सतीशचंद्र सुद्रिक यांनी युक्तीवाद केला. त्यांना दि. १७ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश झाला.
दरम्यान, पूर्वी अटक करण्यात आलेले शिक्षक सुवर्णा अकोलकर, संगीता जाधव, रेश्मा सोनवणे, भिमाजी लोंढे, योजना काकड, ललिता जाधव, नाथू मुठे, विद्या राऊत, बबन देवडे व महादेव देवडे हे १० शिक्षक सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत, त्यांनी जामीन मिळण्यासाठी वरिष्ठ न्यायालयात अर्ज सादर केला होता. तो जिल्हा सत्र न्यायाधीश एम. व्ही. देशपांडे यांनी आज फेटाळला. सरकारतर्फे सरकारी वकील रमेश जगताप यांनी काम पाहिले.
पोलिसांनी चौकशीसाठी जिल्हा शल्य चिकित्सकांसह आरोग्य विभागातील १४ वैद्यकीय अधिकाऱ्यांना समन्स पाठवले होते, या अधिकाऱ्यांनी शिक्षकांकडील प्रमाणपत्रावरील आपले हस्ताक्षर नाकारले आहे, त्यामुळे आता त्यांच्या हस्ताक्षरांचे नमुने तपासणीसाठी तज्ज्ञांकडे पाठवली जाणार आहेत.
‘राजळेंविषयीची चर्चा थांबवावी’
दरम्यान, जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीने माजी आमदार राजीव राजळे यांच्या सुसंस्कृत प्रतिमेला धक्का बसेल अशी सुरु असलेली चर्चा थांबवावी, अशी मागणी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली आहे. दबाव टाकून कामे करुन घेण्यासाठी राजळे हे आपल्याला अपशब्द वापरुन शिवीगाळ करत असल्याची तक्रार जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र पाटील यांनी सरकारकडे केली आहे. या तक्रारीत अपंगत्वाचे बनावट प्रमाणपत्र सादर करणाऱ्या शिक्षकांवर गुन्हे दाखल न होण्यासाठीही दबाव टाकल्याचा उल्लेख आहे. या पाश्र्वभूमीवर शिक्षकांनी हे निवेदन दिले आहे. जि. प. उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीच्या सभापती मोनिका राजळे यांच्या कार्यकाळात शिक्षकांमध्ये सौहार्दाचे वातावरण निर्माण झाले, शिक्षकांचे प्रश्न त्या आत्मियतेने सोडवतात, राजीव राजळे शिक्षण समितीच्या कामात हस्तक्षेप करत नाहीत. त्यांची प्रतिमा उच्च विद्याविभूषित व सुसंस्कृत आहे, ते अधिकाऱ्यांना अपशब्द वापरतील असे वाटत नाही, त्यांच्या प्रतिमेला धक्का बसेल अशी चर्चा क्लेशदायी आहे, ती थांबवण्याची संबंधितांना सूचना द्यावी, असे निवेदनात म्हटले आहे. सर्वश्री आबासाहेब जगताप, बापू तांबे, रा. वी. शिंदे, बाबासाहेब कुलट, संजय कळमकर, सीताराम सावंत, राजेंद्र निमसे, आबासाहेब लोंढे, सुनील जाधव, दिलीप दहिफळे, भास्कर हिंगडे, भिवसेन भोर आदींच्या निवेदनावर सह्य़ा आहेत.