महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांप्रमाणे नोकरी किंवा व्यवसाय करून शिक्षण घेणाऱ्या ‘दूर व मुक्त अध्ययन संस्थे’च्या (आयडॉल) विद्यार्थ्यांनाही १०० पैकी २० टक्के गुणांचे ‘दान’ अंतर्गत मुल्यांकनाच्या माध्यमातून देण्याचा मुंबई विद्यापीठाचा विचार आहे.
श्रेयांक-श्रेणी, ६०:४० या परीक्षा पद्धतींमधून महाविद्यालयातील नियमित विद्यार्थ्यांना ४० टक्के गुण अंतर्गत मुल्यांकनापोटी देण्यात येतात. असाइनमेंट, प्रकल्प, वर्गातील उपस्थिती, कार्यक्रमांमधील सहभाग आदीच्या आधारे हे गुण निश्चित केले जातात. आयडॉलचे विद्यार्थी नियमित नसल्याने त्यांना हे गुण कशाच्या आधारे द्यायचे असा प्रश्न होता. त्यामुळे श्रेयांक किंवा ६०:४० परीक्षा पद्धती केवळ नियमित विद्यार्थ्यांपुरत्या मर्यादीत ठेवण्यात आल्या. मात्र, अंतर्गत मूल्यांकनापोटी गेल्या वर्षी महाविद्यालयांकडून आपल्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या गुणांच्या भरमसाठ ‘दाना’मुळे टीवायबीकॉमचा २०१२ चा निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल २० टक्क्य़ांनी वाढला. गुणांचे हे दान आपल्याही पारडय़ात पडावे यासाठी अनेक विद्यार्थी आयडॉलचे प्रवेश रद्द करून मिळेत त्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेत आहेत. आयडॉलचा प्रवेश रद्द करून अन्य महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी ‘ना हरकत’ प्रमाणपत्र घ्यावे लागते. २०११ साली बीकॉमच्या दुसऱ्या वर्षांतून शेवटच्या वर्षांला प्रवेश घेणाऱ्या केवळ २१८ विद्यार्थ्यांनी हे प्रमाणपत्र घेतले होते. २०१२ साली ही संख्या तब्बल ७३९ वर गेली. म्हणजेच इतक्या विद्यार्थ्यांनी बीकॉमच्या तिसऱ्या वर्षांत महाविद्यालयातून शिक्षण घेणे पसंत केले आहे. आयडॉलमधून महाविद्यालयांकडे जाणारा विद्यार्थ्यांचा हा ओघ थांबविण्यासाठी त्यांनाही अंतर्गत मूल्यांकनाचे ‘गाजर’ दाखविण्याचा विचार आहे. आयडॉलमधून ‘एमए-शिक्षण’ या विषयाच्या प्रत्येक पेपरला २० टक्के गुणांची असाईनमेंट दिली जाते. शिवाय बीएससी-आयटी, बीएससी-कम्प्युटर या विषयांनाही प्रात्यक्षिक, प्रकल्प या माध्यमातून अंतर्गत मुल्यांकनासाठीचे गुण दिले जातात. याच धर्तीवर बीए, बीकॉम, एमए आणि एमकॉम या शाखांनाही २० टक्के गुणांची असाईनमेंट देऊन गुण निश्चित करण्याची ही योजना आहे. ‘हा प्रस्ताव लवकरच आयडॉलच्या सल्लागार मंडळात चर्चेला येणार असून त्यानंतर तो विद्यापीठाच्या विद्वत सभेकडे मंजुरीकरिता मांडण्यात येईल,’ असे संस्थेचे संचालक डॉ. डी. हरिचंदन यांनी सांगितले. विद्वतसभेची मंजुरी मिळाल्यानंतर २०१३-१४पासून विद्यार्थ्यांना याचे फायदे घेता येतील.
अशी आहे योजना
प्रवेश घेतानाच प्रत्येक पेपरच्या असाईनमेंटसाठी विषय सुचविले जातील. त्यापैकी एक विषय निवडून विद्यार्थ्यांनी डिसेंबपर्यंत ही असाईनमेंट पूर्ण करून संस्थेकडे सादर करावी. या असाईनमेंट तपासून त्याचे गुण अंतिम निकालाच्या वेळेस निकालपत्रात समाविष्ट केले जातील. त्यामुळे, आयडॉल आणि विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे उत्तरपत्रिका तपासणीचे कामही २० टक्क्य़ांनी कमी होईल.

आर्थिक गणित
आयडॉलचे विद्यार्थी कमी होणे म्हणजे शुल्क स्वरूपात मिळणारे उत्पन्न कमी होणे. दरवर्षी आयडॉलला ३५ ते ४० कोटी रुपये शुल्क स्वरूपात मिळतात. त्यापैकी, संस्थेवर खर्च होऊन उर्वरित साधारणपणे २० ते २५ कोटी रुपये विद्यापीठाला वापरता येतात. त्यामुळे, आर्थिकदृष्टय़ा विचार करताही आयडॉलचे विद्यार्थी कमी होणे विद्यापीठाला परवडणारे नाही.