प्रचितगड येथे गिर्यारोहणासाठी गेलेल्या रवींद्र वस्ताद (वय ३४) हा िशक आल्याचे निमित्त होऊन खोल दरीत कोसळला. त्यातच त्याला जीव गमवावा लागला. त्याचबरोबर मध्यमवर्गीय कुटुंबाचा आधार हरपला. वस्ताद कुटुंबासाठी आर्थिक स्वरूपात मदत उभी करून त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी पाटाकडील तालीम परिसरातील तरुण पुढे आले आहेत. त्यांनी विविध सेवा, संघटना, दानशूर व्यक्तींना मदतीचे आवाहन केले आहे.
रोख व धनादेश स्वरूपात ही मदत स्वीकारली जाणार आहे. इच्छुक दानशूरांनी मदत एनकेजीएसबी बँक शाखा उमा टॉकीज येथील खाते क्रमांक एसबी/५१५८ वर जमा करावी, असे आवाहन पाटाकडील तालमीचे उपाध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांनी पत्रकार परिषदेत केले.  
गिर्यारोहक रवींद्र वस्ताद म्हणजे धाडसी, मनमिळावू गरीब स्वभावाचा तरुण. खासगी नोकरी करून तो दहा माणसांच्या कुटुंबाची जबाबदारी ओढत होता. कामातून वेळ मिळेल तेव्हा गिर्यारोहणाचे कार्यक्रम आखणे, त्यात तरुणांना सहभागी करून घेण्यात
प्रयत्नशील असणारे त्याचे व्यक्तिमत्त्व होते. रवींद्रचे लग्न झाले असून त्याला तीन वर्षांची मुलगी आहे. मोठय़ा भावाचा छोटा मासेमारीचा व्यवसाय असल्याने कुटुंबाची जबाबदारी रवींद्रच्या अंगावरच होती. त्याच्या जाण्याने कुटुंबाचा आर्थिक आधार तुटला आहे.
यावेळी विजय तिकोणे, मेहबुब हकीम, शेखर ठोंबरे, अमरदीप कुंडले, अभिजित जाधव, गणेश देवणे, सुनील ठाकूर, धोंडीराम कांबळे, ऋषीकेश नलवडे, रत्नदीप कुंडले, रवींद्र नलवडे, रवी कापडे, मनोज माळी आदी उपस्थित होते.