वेतन गोठवलेल्या रात्र शाळांनी वेतन देयके सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शासनाने शाळा बंद करून शिक्षकांची सेवा समाप्त करण्याचा सपाटा चालवला आहे. मूलभूत भौतिक गरजांच्या अभावात शाळा बंद केल्या जात आहेत. रात्र शाळांनाही त्याचा फटका बसला. रात्रशाळेतील ५० टक्क्यांपेक्षा जास्त अनुपस्थिती असलेल्या शाळांना भौतिक गरजांच्या अभावात बंद करण्याचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी(माध्यमिक) यांनी उपसंचालकांना पाठवला. त्यानंतर उपसंचालकांनी संचालकांना व संचालकांनी प्रस्ताव शासनाला पाठवला. शहानिशा न करता रात्र शाळा बंद करण्याची कार्यवाही करण्यात आली.
त्यासाठी कोणतीही सूचना न देता मे-२०१३पासून वेतन कसे काय गोठवण्यात आले ही बाब सत्यशोधक शिक्षक सभेने शिक्षणाधिकाऱ्यांना विचरली.
तसेच ताबडतोब वेतन सुरू करण्याची मागणी केली. शिक्षणाधिकाऱ्याने सकारात्मक भूमिका घेऊन वेतन न गोठवण्याचे निर्देश वेतन पथकाला दिले.
वेतन गोठवलेल्या रात्र शाळांनी वेतन देयके सादर करण्याचे आवाहन पत्रकाद्वारे संघटनेचे अध्यक्ष रमेश बिजेकर यांनी केले. शासनाकडे वंदना वनकर, मो. जफर, आरिफ खान, इनामूल रहीम, सय्यद अयाज, अशरफ अली, प्रकाश कांबळे, देवेंद्र सहारे, प्रवीणा बालपांडे, शालिनी बारई आणि सय्यद शरीफ यांनी या समस्येच्या सोडवणुकीसाठी पाठपुरावा केला.