मुंबईतील नोकरदारांसाठी जेवणाच्या डब्याची ने-आण करणाऱ्या आणि आपल्या वैशिष्टय़पूर्ण व्यवस्थापनाने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या मुंबईच्या डबेवाल्यांची दखल महापालिकेनेही घेतली आहे. बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाजवळ असलेल्या वाहतूक बेटावर ‘डबेवाल्या’चा पंधरा फुटाचा पुतळा उभारण्यात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवार २० जून रोजी या पुतळ्याचे अनावरण होणार आहे.
ज्या वाहतूक बेटावर हा पुतळा उभारण्यात आला आहे, त्या बेटाला डबेवाला संस्थेचे संस्थापक दिवंगत महादू बच्चे यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी ‘मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळा’ने केली असून याबाबत महापौर सुनील प्रभू यांना निवेदन देण्यात येणार आहे.
मुंबईचे डबेवाले गेली सव्वाशे वर्षे मुंबईत काम करत असून त्यानिमित्ताने मंडळाचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी ‘आम्ही मुंबईचे डबेवाले’ हे पुस्तक लिहिले आहे. त्याचे प्रकाशनही या कार्यक्रमात ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.