18 September 2020

News Flash

जळगावमध्ये नगरसेवकाची हत्या

महापालिकेतील सत्ताधारी गटाच्या शहर विकास आघाडीचे नगरसेवक विनायक काशिनाथ सोनवणे यांची मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास तीक्ष्ण हत्याराने हल्ला चढवून हत्या करण्यात आल्याने शहरात खळबळ

| December 19, 2012 02:37 am

महापालिकेतील सत्ताधारी गटाच्या शहर विकास आघाडीचे नगरसेवक विनायक काशिनाथ सोनवणे यांची मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास तीक्ष्ण हत्याराने हल्ला चढवून हत्या करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज असून पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले आहे.
शहरातील विधी महाविद्यालयाच्या मैदानाजवळच्या रस्त्यावर ही घटना घडली. सोनवणे हे शहराकडे येत असताना तेथे दबा धरून बसलेल्या किंवा त्यांच्यावर पाळत ठेवणाऱ्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. अवघ्या काही मिनिटांत हा प्रकार घडल्याने काही कळायच्या आत सोनवणे खाली कोसळले. या घटनेची माहिती पसरल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. जखमी अवस्थेतील सोनवणेंना शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तत्पूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रकरणी नाना सूर्यवंशी ऊर्फ दाढी याला संशयावरून जिल्हा पेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
विनायक सोनवणे व नाना दाढी यांच्यात काही दिवसांपूर्वी मुलांवरून वाद झाल्याचे सांगण्यात येते. त्या वादाच्या कारणावरून सोनवणे यांची हत्या करून बदला घेतला गेला असावा, असा पोलीस यंत्रणेचा अंदाज आहे. २००८ मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत विनायक सोनवणे हे शहर विकास आघाडीचे उमेदवार म्हणून सर्वप्रथम निवडून आले होते. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाब देवकर यांचा त्यांनी पराभव केल्यामुळे त्यांचे नाव एकदम चर्चेत आले होते. या घटनेचे सावट सोनवणे यांच्या प्रभाग क्रमांक ४४ वरही पसरल्याचे पाहावयास मिळाले. या घटनेची माहिती समजल्यानंतर शहर विकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. राजकीय वर्तुळात या घटनेविषयी वेगवेगळे तर्कवितर्क व्यक्त होत आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2012 2:37 am

Web Title: murder of corporator in jalgaon
Next Stories
1 सततच्या पाणीटंचाईमुळे महिलांचा रौद्रावतार
2 इगतपुरीत आज निवडणूक आयुक्तांचे शिबीर
3 ग्रामविकास अधिकाऱ्यांऐवजी ग्रामसेवकांकडे कारभार
Just Now!
X