पुणे रस्त्यावर कोंडी येथे एका मालमोटारीत खून करून टाकलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून, सिमेंटची विक्री परस्पर केली म्हणून मूळ चालकाने साथीदारांच्या मदतीने सोबतच्या दुस-या चालकाचा खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले.
शिवशंकर गौढ (वय ३७, रा. आळंद, जि. गुलबर्गा) असे खून झालेल्या चालकाचे नाव आहे. आंध्र प्रदेशातून सिमेंट घेऊन गौढ हा पुण्याकडे निघाला होता. या सिमेंटवाहू मालमोटारीचा मूळ चालक सैफन शेख याने रमजान ईदमुळे सुटी घेतली होती. मात्र बदलीवरील चालक गौढ याने मालमोटारीतील काही सिमेंटची पोती परस्पर विकली आणि आलेल्या पैशातून मद्यप्राशन केले. त्याचा राग मनात काढून सैफन शेख याने आपले मित्र बाळासाहेब भागवत घोडके व ताजोद्दीन शेख यांच्या मदतीने बेदम मारहाण केली. यातच त्याचा मृत्यू झाला. सोलापूर तालुका पोलिसांनी सैफन शेख व बाळासाहेब घोडके यांना अटक केली. त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.