कवठेमहांकाळ नजीक अज्ञात तरुणीचा झालेला खून हा बुवाबाजीतून झाला असावा, असा तपास यंत्रणेचा प्राथमिक कयास असून मयत तरुणी कर्नाटकातील असल्याचे स्पष्ट झाले आहे.  तथापि तरुणीच्या नातलगांनी ओळख दर्शविल्याशिवाय पुढील माहिती हाती येणार नसल्याचे पोलीस अधिका-यांनी गुरुवारी सांगितले.
मिरज-पंढरपूर महामार्गावर बुधवारी २२ वर्षीय तरुणीचा मृतदेह लांडगेवाडीच्या हद्दीत निर्जन स्थळी मिळाला होता.  गुरे राखणा-या महिलेने हा मृतदेह प्रथम पाहिला. या संदर्भात कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात अज्ञात तरुणीच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.  घटनास्थळी पोलिसांना एक बॅग आढळली असून त्यामध्ये सुपारी, खाऊची पाने, टुथब्रश, पावडर आदी वस्तू मिळून आल्या.  मृत तरुणीच्या अंगात पिवळया रंगाचा पंजाबी टॉप, लाल रंगाची ओढणी व पायजमा, गळयात तुळशीची माळ व नाकात नथ आहे.
सदर मुलीचे पंढरपूर येथून अपहरण झाले असावे अशी शक्यता तपास सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे. अपहरण करण्यात आलेली तरुणी कर्नाटकातील रायचूर येथील मूळ रहिवासी असावी अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित तरुणीच्या नातलगांशी पोलिसांनी संपर्क साधला असून कर्नाटकातून रायचूरहून हे नातलग कवठेमहांकाळकडे येण्यास निघाले आहेत.  रात्री उशिरा पोलीस ठाण्यात पोहोचण्याची शक्यता असून त्यानंतरच या तरुणीची ओळख पटणार आहे.
 या तरुणीला बुवाबाजी करणा-या महाराजाकडून धार्मिक कार्यासाठी घरातून बाहेर काढले असावे असा कयास असून त्या दिशेने तपास सुरू असला तरी, मृतदेहाची ओळख पटल्याशिवाय अद्याप स्पष्ट होणार नसल्याचे सांगण्यात आले.