कधी काळी व्यापाराचे प्रमुख केंद्र राहिलेल्या आणि बौद्ध धर्माचे पुरातन स्थळ असलेल्या नालासोपाऱ्याला अखेर महाराष्ट्र पर्यटनाच्या नकाशावर स्थान देण्यात आले आहे. राज्यातील बौद्ध धर्माच्या पर्यटनयात्रेची सुरुवात नालासोपाऱ्यातून करण्याचा स्तुत्य उपक्रम महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने सुरू केला असला तरी त्याआधी या स्थळाच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
राज्यातील बौद्ध धर्माच्या प्रमुख स्थळांचा प्रवास घडवून आणण्याची योजना पर्यटन महामंडळाने आखली आहे. त्याची सुरुवात सम्राट अशोकाने नालासोपारा येथील बांधलेल्या स्तूपापासून केली जाणार आहे. ‘सम्राट अशोक यांचा मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा यांनी श्रीलंकेत बुद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी नालासोपारामधून प्रयाण केल्याचे समजले जाते, त्यामुळे आम्ही या स्थळाची निवड केली,’ असे राज्य पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक जगदीश पाटील यांचे मत आहे. नागपूर येथील दीक्षाभूमीपर्यंत जाणाऱ्या या यात्रेत दादर येथील चत्यभूमी व गोराई येथील पॅगोडाचाही समावेश आहे.बौद्ध धर्माच्या पर्यटनस्थळांना लोकप्रियता मिळवून देणे हा स्तुत्य उपक्रम आहे. मात्र त्याआधी या स्थळाची दुर्दशा थांबवण्यासाठी व त्याचे संवर्धन करण्यासाठी योग्य ती पावले उचलली गेली नसल्याचे मत या विषयातील अभ्यासक डॉ. सूरज पंडित यांनी व्यक्त केले. नालासोपारा येथे रस्त्यांवर, देवळात अनेक ठिकाणी आजही पुरातन काळातील मूर्ती, विविध प्रतिमा सापडतात. स्तूप हा नालासोपारा परिसरातील सुमारे पन्नास संवर्धन स्थळांपैकी एक आहे. केंद्रीय पुरातत्त्व विभागाने या स्तूपाचे संवर्धन केले असले तरी रस्त्याकडेला पडलेल्या इतर अवशेषांची जबाबदारी घेण्यासाठी राज्य पुरात्त्व विभाग पुढे आलेला नाही. नालासोपारा येथील चक्रेश्वर तीर्थ मंदिर येथे ब्रह्माची दहाव्या शतकातील, बहुधा भारतातील सर्वात पुरातन मूर्ती आहे. ब्रह्माच्या आणखी दोन प्रतिमाही नालासोपाऱ्यात रस्त्याकडेला आहेत. त्यांचे जतन करणेही आवश्यक आहे. या भागातील पुरातन काळातील मूर्ती, प्रतिमा, लेख एकत्र करून त्यांचा संग्रह केल्यास पर्यटनासाठीही अधिक चालना मिळेल, असे डॉ. पंडित म्हणाले.
 नालासोपाराचे वैशिष्ट्य
सुमारे २६०० वर्षांपूर्वी नालासोपारा हे पश्चिम किनारपट्टीवरील प्रमुख व्यापारी केंद्र होते. या बंदरावरून मेसोपोटेमिया, अरेबिया, ग्रीस, रोम आणि आफ्रिकेत व्यापार होत असे. पूर्ण मत्रीयानीपुत्रा हा येथील श्रीमंत व्यापारी कामानिमित्त उत्तर प्रदेशमध्ये गेला असता बौद्ध धर्माच्या संपर्कात आला. बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी त्याने नालासोपारा येथे बौद्ध विहार बांधला, या विहाराची आठही प्रवेशद्वार चंदनाची होती. स्वत गौतम बुद्ध आपल्या ५०० अनुयायांसह या विहाराचे उद्घाटन करण्यासाठी नालासोपारा येथे आठवडाभर राहिले होते, असा इतिहासात उल्लेख आहे. गौतम बुद्धांच्या भेटीची आठवण म्हणून येथे त्यांचे भिक्षापात्र ठेवण्यात आले. पंडित भगवानलाल इंद्रजीत यांना ९ एप्रिल १८८२ रोजी हे भिक्षापात्र सापडले. यानंतर बऱ्याच काळाने सम्राट अशोकने नालासोपारा येथे स्तूप बनवले. येथूनच त्याची मुले श्रीलंकेत धर्मप्रसारासाठी गेली. सम्राट अशोकने लिहिलेल्या १४ शिलालेखांपकी ९ शिलालेख आणि स्तूपदेखील येथे सापडले आहेत.