अंतराळविषयक विविध घडामोडींचा अनुभव विद्यार्थ्यांना घेता यावा यासाठी मुंबईच्या ब्ल्यू सेल्स या संस्थेतर्फे अॅडव्हान्स स्पेस अॅकॅडमी विंग्स नासा यांच्या सहकार्याने आयोजित पाच दिवसीय शिबीरात येथील पराग व गौरी या सपकाळ भावंडांनी सहभाग घेतला. याशिवाय येथील फ्रावशी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनीही नासा केंद्रास भेट दिली.
अमेरिकेतील अलाबामामधील हन्टसविले येथील युएस स्पेस अॅण्ड रॉकेट सेंटर येथे हे शिबीर झाले. शिबीरार्थीचे दोन गट  करण्यात आले होते. त्यामध्ये मुंबईतील बॉम्बे कॉटीश या शाळेत शिक्षण घेत असलेले येथील पराग व गौरी सपकाळ यांनी सहभाग घेऊन ऑरीऑन मिशन, शटल मिशन, अॅडव्हेंचर अॅक्टिव्हिटीज्, जी-फोर्स, फ्लाईंग फोर्स, स्कुबा डायव्हिंग, ग्रॅव्हिटी चेअर, एमएमयु सिम्युलेटर, मून वॉक अशा प्रकारच्या अनेक प्रकारांमध्ये सहभाग घेतला. वेगवेगळ्या प्रकारच्या रॉकेट  बांधणीचे प्रात्यक्षिकही त्यांनी केले. अमेरिकेतील संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना शिबीर पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
दरम्यान, येथील फ्रावशी अकॅडमीच्या वतीने १२ दिवसांसाठी अमेरिका सहलीवर गेलेल्या विद्यार्थ्यांनीही नासा केंद्रास भेट देऊन माहिती घेतली. नासा येथील अवकाश केंद्राच्या भेटीत अवकाश यानाच्या स्वयंचलनाचा अनुभव घेत आव्हानात्मक अशा विज्ञान, गणित, अभियांत्रिकी विषयांवर आधारित प्रश्नमंजुषेत विद्यार्थ्यांनी भाग घेतला. यावेळी नासाचे माजी अवकाश यात्री जेम्स एस. रिली यांनी प्रश्नोत्तर सत्रात सहभाग घेतला. एकूण तीन दिवसीय नासा भेटीच्या समारोपाप्रसंगी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, पदक, अवकाशयात्रींची स्वाक्षरी असलेली स्मरणिका प्रदान करण्यात आली.