News Flash

निफाडमध्ये राष्ट्रवादीसमोर अडथळ्यांची मालिका

मागील निवडणुकीप्रमाणे यावेळच्या लोकसभा निवडणुकीतही दिंडोरी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हरिश्चंद्र चव्हाण यांची भरभक्कम पाठराखण निफाड विधानसभा मतदारसंघाने केल्याने विधानसभेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीसमोर अडथळ्यांची मालिकाच उभी

| May 21, 2014 09:12 am

मागील निवडणुकीप्रमाणे यावेळच्या लोकसभा निवडणुकीतही दिंडोरी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हरिश्चंद्र चव्हाण यांची भरभक्कम पाठराखण निफाड विधानसभा मतदारसंघाने केल्याने विधानसभेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीसमोर अडथळ्यांची मालिकाच उभी राहिली आहे.
लोकसभेसाठी दिंडोरी मतदारसंघात समाविष्ट झाल्यापासून निफाडने विरोधकांना साथ केली आहे. २००९ च्या निवडणुकीत निफाड विधानसभा मतदारसंघाने चव्हाण यांना भलीमोठी आघाडी दिली होती. चव्हाण यांच्या विजयात निफाडमधून मिळालेली आघाडी निर्णायक ठरली होती. त्यामुळेच यावेळच्या निवडणुकीतही चव्हाण यांनी निफाड तालुक्यावर अधिक भिस्त ठेवली होती. प्रचारातही त्यांनी विशेष लक्ष दिले होते. तर, आघाडीने पिंपळगाव बसवंतसह ठिकठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे संयुक्त मेळावे घेत वातावरण निर्मिती केली होती. आघाडीतील सर्व नेते यावेळी एकत्र आल्याचे चित्र रंगविण्यात आल्याने महायुतीच्या उमेदवारासमोर आव्हान उभे करण्यात आल्याचे बोलले जात होते. राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पिंपळगावच्या मेळाव्यात महायुतीवर जोरदार टिकास्त्र सोडत आता आघाडीचे सर्व नेते एकत्र आल्याची डरकाळी फोडली होती. परंतु लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर निफाड तालुक्यातील मतदारांना आघाडीला साफ नाकारल्याचे दिसून आले. महायुतीच्या उमेदवाराला ५० हजारापेक्षा अधिकचे मताधिक्य देत निफाड विधानसभा मतदारसंघाने राष्ट्रवादीच्या नेत्यांचे सर्व दावे फोल ठरविले.
शिवसेनेचे अनिल कदम हे निफाडचे प्रतिनिधीत्व करत असून सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहणाऱ्या कदमांना महायुतीने घेतलेल्या या मताधिक्यामुळे चांगलेच हायसे वाटले असणार. पक्षापेक्षा गटातटाचे राजकारण निफाड तालुक्यात अधिक खेळले जाते. पक्षाचा उमेदवार म्हणून मतदान करण्यापेक्षा कोणता उमेदवार कोणत्या गटाशी जवळीक साधून आहे. त्यास या तालुक्यात अधिक महत्व दिले जाते. लोकसभा निवडणुकीत अशा प्रकारच्या गटातटाच्या राजकारणाचे प्रतिबिंब दिसले नाही. कारण मोदी लाटेमुळे सर्व मतदार महायुतीच्या उमेदवारामागे एकवटले गेले. परंतु विधानसभा निवडणुकीत मात्र राजकारणाची दिशा बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आपले वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी कदमांना मोदी लाटेचा प्रभाव विधानसभा निवडणुकीपर्यंत कायम ठेवण्यासाठी शिकस्त करावी लागेल. दुसरीकडे राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा दिलीप बनकर हेच उमेदवारी करण्याची शक्यता असून त्यासाठी त्यांनी तयारीही सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर अनिल कदम यांना कर्मचाऱ्यांनी अडविल्यानंतर कदम यांनी महिला कर्मचाऱ्यांना केलेल्या दमबाजीचे प्रकरण चांगलेच गाजले होते. त्या प्रकरणाचा राजकीय लाभ उठविण्यासाठी बनकर यांनी दुसऱ्याच दिवशी टोल नाक्यावरील महिला कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आपण आहोत हे दाखविण्यासाठी त्यांना साडी भेट दिली होती. बनकर आणि कदम यांच्यातील राजकीय वैर निफाड तालुक्यासाठी सर्वश्रृत आहे.
    बनकर हे मागील निवडणुकीत पराभूत झालेले असल्याने राष्ट्रवादीकडून त्यांच्याऐवजी दुसऱ्या नावाची उमेदवारीसाठी चर्चा होऊ शकते. परंतु मोदी लाट आणि राज्य सरकारच्या विविध निर्णयांमुळे सर्वसामान्यांमध्ये असलेली नाराजी महायुतीच्या पथ्थ्यावर पडणारी आहे. विधानसभा निवडणुकीत आघाडीच्या उमेदवारासाठी तीच मोठी डोकेदुखी टरणार असल्याने यातून मार्ग काढणे त्यांच्यासाठी एक आव्हान राहणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2014 9:12 am

Web Title: ncp having problems in niphad
टॅग : Ncp
Next Stories
1 मुश्रीफ खान ‘नाशिक श्री’चा मानकरी
2 ‘शिवाजी अंडरग्राउंड..’च्या कलाकारांचा गौरव
3 भरवशाच्या ‘मध्य नाशिक’चाही आघाडीला दणका
Just Now!
X