राज्यातील ९ हजार गावांमध्ये दुष्काळ जाहीर झाला. या गावांमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये, म्हणून राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट स्थापन करण्यात आला आहे. दुष्काळी भागातून आलेल्या अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना वगळून अन्य गरजू विद्यार्थ्यांना मार्च-एप्रिलमध्ये दोन हजार रुपये मदत देण्यात येणार असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सोमवारी जाहीर केले.
राज्यातील १३ जिल्हय़ांमध्ये भीषण दुष्काळ आहे. शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले. मात्र, शहर व तालुक्याच्या ठिकाणी पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. त्यांच्या जेवणाचीही अडचण होत आहे. वार्षिक परीक्षा मेपर्यंत संपतील. मार्च-एप्रिल महिन्यात अशा विद्यार्थ्यांना मदतीची गरज लागेल. त्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये, म्हणून राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे ही रक्कम दिली जाणार आहे. ज्या गावातील पैसेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे, अशा राज्य सरकारने दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेल्या गावांमधून शिक्षणासाठी शहरात वसतिगृहांवर अथवा खोली करून राहणाऱ्या विद्यार्थ्यांना ही मदत केली जाणार असल्याचे पवार यांनी सांगितले. अशा गरजू विद्यार्थ्यांची यादी विद्यापीठांकडून मागविली आहे. या प्रकारची मदत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर), उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (जळगाव), मराठवाडा कृषी विद्यापीठ (परभणी), महात्मा फुले कृषी विद्यापीठ-राहुरी येथील विद्यार्थ्यांना केली जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी व सदस्यांनी या ट्रस्टमध्ये निधी द्यावा, असे कळविण्यात आले आहे. हा उपक्रम राबवताना कोठे गैरव्यवहार झाले तर संपर्कासाठीची हेल्पलाईनही देण्यात आली आहे. या उपक्रमाचे समन्वयक राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष नीलेश राऊत आहेत.