महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत सामोपचाराने तंटे मिटविण्याची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी प्रशासन व तंटामुक्त गाव समितीने त्या अनुषंगाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. लोक न्यायालयांच्या मदतीने ही प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्हा व तालुका प्रशासनाने जिल्हा व तालुका पातळीवर अधिकाधिक लोकन्यायालयांचे आयोजन करून तंटे मिटविण्याचा प्रयत्न करणे अभिप्रेत असल्याचे शासनाने म्हटले आहे.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश असून जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक हे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य आहेत. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या बैठका व कार्यक्रमांत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी सक्रिय सहभाग घेणे अपेक्षित आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत तडजोड झालेल्या तंटय़ांच्या, दाव्यांच्या संकलित माहितीच्या आधारे जिल्हा पातळी व तालुका पातळीवर जास्तीतजास्त लोक न्यायालये आयोजित करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत प्रयत्न करावेत, असे शासनाने सूचित केले आहे. तालुका पातळीवर तालुका विधी सेवा समिती निर्माण करण्यात आली आहे. तालुक्यातील वरिष्ठ न्यायिक अधिकारी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष असतात. तहसीलदार आणि तालुक्यातील पोलीस ठाण्यांचे प्रभारी पोलीस अधिकारी यांनी तंटामुक्त गाव मोहिमेत गावनिहाय झालेल्या तडजोडीची संख्या विचारात घेऊन मुख्यालय, पोलीस ठाणेनिहाय अथवा महसुली मंडळनिहाय लोक न्यायालये आयोजित करण्यासाठी तालुका विधी सेवा समितीला विनंती करावी. एखाद्या गावात तडजोड झालेल्या दाव्यांची संख्या मोठय़ा प्रमाणावर असल्यास शक्य असेल तर अशा गावांमध्ये अथवा गावांच्या जवळपासच्या गावांसाठी लोकन्यायालय आयोजित करण्यासाठी तालुका प्रशासनाला प्रयत्न करता येईल, असे शासनाने म्हटले आहे.
तंटामुक्त गाव समितीने सामोपचाराने तंटा मिटविल्यानंतर लोकन्यायालयाकडे अर्ज करणे आवश्यक आहे. तडजोड झालेल्या तंटय़ांमध्ये व दाव्यांमध्ये, तालुका विधी सेवा समितीकडे अर्ज करून हुकूमनामा अथवा आदेश प्राप्त करून घेण्यासाठी तंटामुक्त गाव समिती आणि तडजोडीत सहभागी झालेल्या पक्षकारांना आवाहन केले जाते.
लोकन्यायालयाचा हुकूमनामा अथवा आदेश प्राप्त झाल्यानंतर त्याची सत्यप्रत अभिलेखावर घेऊन त्याद्वारे तंटा मिटला, असे समजले जाते.
गावातील शांततेचे वातावरण विकासप्रक्रियेला पोषक ठरत असते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने ग्रामीण भागातील तंटा-बखेडय़ांचे प्रमाण कमी करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू केले आहे. या माध्यमातून स्थानिक पातळीवरील तंटे सामोपचाराने मिटविणे आणि विविध स्वरूपाचे उपक्रम राबवून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न होत आहे. या अभियानातील एकूणच कामगिरीचा वेध लेखमालेतून घेण्यात येत आहे. मालेतील पन्नासावा लेख.