डॉनचे गुंड बिल्डरांकडे मजूर
बांधकाम व्यावसायिकांकडून खंडणीवसुली हा ‘चरितार्था’चा मार्ग बनवलेल्या गुंड टोळ्यांना दिवसेंदिवस ‘टीप’ मिळणे कठीण होत चालले आहे. अशा वेळी बिल्डरांची माहिती काढण्यासाठी आपल्याच साथीदारांना मजूर म्हणून कामावर ठेवण्याची नवी युक्ती शोधून काढण्यात आली आहे. या साथीदार मजुरांकडून आवश्यक ती सर्व माहिती मिळत असल्यामुळे गुन्ह्य़ाची ही नवी पद्धत माफियांनी अमलात आणल्याचे आढळून आले आहे.
गुन्हे अन्वेषण विभागाच्या चेंबूर युनिटने अलीकडेच गुन्ह्य़ाची ही नवी पद्धत उघड केली आहे. दाऊद, छोटा शकील, छोटा राजन या माफियांना अलीकडे फारशी खंडणीवसुली करावी लागत नाही. याचे कारण म्हणजे त्यांचेच काही साथीदार आता बिल्डर म्हणून वावरत आहेत. मात्र रवी पुजारीकडून अद्यापही खंडणीसाठी बिल्डरांना दूरध्वनी येत आहेत. गेल्या काही महिन्यांत हे दूरध्वनी कमी झाले असले तरी काही प्रमाणात अधूनमधून दूरध्वनी येत असतात. बिल्डरांच्या कामांची निश्चित माहिती मिळत नसल्यामुळे रवी पुजारीला खंडणीसाठी दूरध्वनी करूनही प्रतिसाद मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा वेळी बिल्डरांचीच माहिती काढून दूरध्वनी केले तर पदरी काही पडेल, या आशेने रवी पुजारीने आपल्या काही साथीदारांना बिल्डरांकडे साईट सुपरवायझर वा मजूर म्हणून काम करण्यास पाठविल्याची माहिती उघड झाली आहे. अशापैकी एक कैलाश मिश्रा प्रधान याच्या जबानीतून ही माहिती उघड झाली आहे. त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि काही काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. आपण रवी पुजारीसाठी टीपरचे काम करीत होता, असे त्याने चौकशीत सांगितले आहे. बिल्डरांची माहिती काढण्यासाठी त्याने आतापर्यंत काही ठिकाणी मजूर म्हणून काम केल्याचेही उघड झाले आहे. मात्र ज्या बिल्डरांकडे त्याने काम केले त्या बिल्डरांना रवी पुजारीने खंडणीसाठी धमकी दिली का, याची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. वरिष्ठ निरीक्षक श्रीपाद काळे यांच्या पथकाने कैलाशला अटक केली. हा कैलाश सुरुवातीला रवी पुजारीचा कट्टर समर्थक सुरेश पुजारी याच्या मटक्याच्या अड्डय़ावर काम करीत होता. रवी पुजारीसाठी टीपर म्हणून वावरू लागल्यानंतर तो मजूर म्हणून काम करू लागला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. रवी पुजारीचे आणखी किती साथीदार अशा रीतीने काम करीत आहेत, याची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

खंडणी वसुलीसाठी बिल्डरांची नीट माहिती मिळणे आवश्यक असते. एखाद्या बिल्डरला दूरध्वनी केल्यानंतर तो लगेच खंडणी देईल का वा पोलिसांकडे जाईल का आदी माहिती मिळविण्याची जबाबदारी या टीपर्सवर असते. माफियाचा दूरध्वनी आल्यानंतर तो घाबरतो का, हेही महत्त्वाचे असते. बिल्डरकडेच टीपर म्हणून वावरणारा आपल्याबद्दल विश्वास निर्माण करतो आणि मग बिल्डरबाबतची सर्व माहिती माफियांना देत असतो, अशी माहितीही पोलीस सूत्रांनी दिली.