समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचे काम या थोर व्यक्तीने केले आहे. ध्येयवादाने प्रेरित झालेली ती मंडळी होती. सध्याच्या परिस्थितीत ध्येय बाजूला पडून त्या ठिकाणी श्रेय आल्याने समाजात आत्मकेंद्रितपणा वाढला आहे. नव्या पिढीला त्यापासून धोका निर्माण झाला असल्याची भीती व्यक्त करताना नव्या पिढीने श्रेयवादात न अडकता ध्येयवादी बनले पाहिजे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी केले.  
कुसूर (ता. कराड) येथील माजी विद्यार्थी संघ, सद्गुरू गाडगेमहाराज महाविद्यालय व पांडुरंग देसाई अध्यापक विद्यालयातर्फे देण्यात येणारा मुकादम साहित्य पुस्कार पुणे येथील राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे अध्यक्ष प्रा. डॉ. जे. पी. देसाई यांच्या ‘अमेरिकेच्या भूमीतून’ या कथासंग्रहास प्रदान करण्यात आला त्या वेळी ते बोलत होते. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. डॉ. देसाई यांचा या वेळी सपत्नीक सत्कार करण्यात आला. प्राचार्य ए. डी. अत्तार आदर्श शिक्षक पुरस्कार कातरखटाव येथील कात्रेश्वर हायस्कूलचे मुख्याध्यापक तानाजी पाटील व चैतन्य पुरस्कार काळगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलचे शिक्षक जयवंत मोरे यांना देण्यात आला. मुकादम तात्यांची स्मरणगाथा चरित्रग्रंथाचे प्रकाशन उपस्थितांच्या हस्ते झाले. कुलगुरू डॉ. पवार यांच्या अध्यक्षतेखाली व पुण्याच्या जनसेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. विनोद शहा यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले.
डॉ. एन. जे. पवार म्हणाले, की ध्येयवादापासून जी पिढी घडली त्याचा आदर्श घेण्याऐवजी श्रेयवादाकडे जाणारी पिढी निर्माण होऊ लागली आहे. शिक्षणाची संधी नसतानाही मुकादम तात्यांचे समाजाच्या जडणघडणीसाठी लाखमोलाचे योगदान आहे. अशिक्षित असूनही त्या काळी परिस्थितीशी तडजोड करून शिक्षणात क्रांती करून समाजसुधारण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
जे. पी. देसाई म्हणाले, की आतापर्यंत मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाले, मात्र या मातीमध्ये मिळालेला हा वेगळय़ा प्रकारचा पुरस्कार आहे. हे माझे भाग्य आहे. हा पुरस्कार म्हणजे माझ्या पावित्र्याचा आणि चारित्र्याचा संगम म्हणावा लागेल.
आर. एल. नायकवडी, एस. के. कुंभार, डॉ. नानासाहेब गायकवाड, डॉ. विनोद शहा आदींची भाषणे झाली. आर. एल. नायकवडी यांनी प्रास्ताविक केले. आर. जी. यादव यांनी आभार मानले.