देशातील एकूण लोकसंख्येच्या १ ते ३ टक्के लोक ‘हेपॅटायटिस-सी’च्या संसर्गाने ग्रसित आहेत. मात्र त्यावरील उपचारांचा खर्च प्रचंड असल्याने तो सामान्य नागरिकाच्या आवाक्यात नाही. हा खर्च कमी व्हावा म्हणून औषधे कमी दरात मिळावीत यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना साकडे घातल्याची माहिती दोन स्वयंसेवी संस्थांनी पत्रकार परिषदेत दिली.
१९९० साली शोध लागलेला ‘हेपॅटायटिस सी’ चा विषाणू ही आता जागतिक समस्या झाली असल्याच्या पाश्र्वभूमीवर दरवर्षी २८ जुलै हा दिवस ‘हेपॅटायटिस डे’ म्हणून साजरा केला जातो. भारतातील एकूण लोकसंख्येच्या १ ते ३ टक्के लोकांना ‘हेपॅटायटिस-सी’चा संसर्ग झाला असल्यामुळे ही सार्वजनिक आरोग्याची फार मोठी समस्या झाली आहे. यावर उपचार न केल्यास ८० टक्के रुग्णांना ‘क्रॉनिक हेपॅटायटिस सी’ होतो. तोवर ‘हेपॅटायटिस सी’ च्या संसर्गाची कुठलीही लक्षणे दिसत नसल्याने तो झाल्याचे निदान होत नाही व परिणामी या कालावधीनंतर त्याचे रूपांतर एकतर ‘लिव्हर सिरॉसिस’ या गंभीर रोगामध्ये किंवा यकृताच्या प्राथमिक स्वरूपाच्या कर्करोगात होते. हे दोन्ही जीवघेणे आहेत. त्यांचा प्रसार रक्त संक्रमणातून होत असल्याने त्यांना प्रतिबंध करणे शक्य आहे, अशी माहिती चिल्ड्रन्स लिव्हर फाऊंडेशनच्या विश्वस्त डॉ. आभा नगराल आणि थिंक फाऊंडेशनचे उपाध्यक्ष विनय शेट्टी यांनी पत्रकारांना दिली.
‘हेपॅटायटिस सी’च्या विषाणूच्या वाढीवर नियंत्रण ठेवता आले, तर यकृताचा कर्करोग रोखता येऊ शकतो. आजवर, ज्यांना सौम्य स्वरूपाचा रोग आहे, त्यांना ‘इंटरफेरॉन’ नावाचे इंजेक्शन देऊन तो रोखणे शक्य होते. परंतु या औषधामुळे मोठय़ा प्रमाणात ‘साइड इफेक्ट्स’ होतात. ‘थॅलेसेमिया मेजर’ असलेल्या रुग्णांच्या शरीरातील रक्त दर ७ ते १४ दिवसांनी बदलले, तरच ते जिवंत राहू शकतात. यातून त्यांना अनेक वैद्यकीय समस्यांना तोंड द्यावे लागू शकते आणि ‘हेपॅटायटिस सी’ ही त्यातीलच एक आहे. त्याच्या सहा महिन्यांच्या उपचाराचा खर्च १ कोटी ८० लाख रुपये असल्याने ही जीवरक्षक औषधे बहुतांश भारतीयांच्या आवाक्याबाहेर आहेत. ही औषधे केवळ परदेशातच तयार होतात. त्यामुळे भारतीय औषध निर्मिती कंपन्यांवर दबाव आणून, रुग्णांना परवडणाऱ्या दरातील औषधे तयार केली जावीत, अशी विनंती आम्ही केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना पत्र पाठवून केली असल्याचे या संस्थांनी सांगितले.
ज्यामुळे हेपॅटायटिस- सी ९० टक्के बरा होण्याची शक्यता आहे, अशी नवी औषधे आठ महिन्यांपूर्वी परदेशी बाजारात आली आहेत. ही औषधेही भारतात कमी किमतीत मिळावीत असे आमचे प्रयत्न आहेत. मुंबईतील ५ केंद्रांमध्ये मिळून ५ ते २० वर्षे वयोगटातील ३१०० मुलांची ‘हेपॅटायटिस सी’ साठी तपासणी करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.