तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या मार्फत तालुक्यातील दूषित पाणी असलेल्या ग्रामपंचायतींना देखील हिरवे कार्ड देण्यात आले आहेत. तालुक्यात हा चर्चेचा विषय ठरला असून अनेकांनी या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
तालुका आरोग्य अधिकारी भाऊसाहेब भोंडवे यांच्याच कामकाजाबद्दल असमाधान व्यक्त होत आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये आजही लोकांना दूषित पाणी प्यावे लागते. या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. आरोग्य विभागाने १ हजार १२३ ठिकाणी पाण्याचे नमुने घेतले असून, त्यातील २७१ ठिकाणचे पाणी दूषित आढळून आले आहे. अनेक ठिकाणी पाण्यामध्ये टीसीएल टाकावे अशा सूचना ग्रामपंचायतींना दिलेल्या असूनही त्या पाळल्या जात नाही. शिवाय ग्रामपंचायतींना मिळणारी टीसीएल पावडरच निकृष्ट असल्याचे समजते. याबाबत संबंधितांवर कारवाई करण्याऐवजी अशा ग्रामपंचायतींना पाण्याबाबतचे हिरवे कार्ड देऊन कारवाई टाळली जात आहे.   
प्राथमिक आरोग्य केंद्रानिहाय दूषित पाण्याच्या तपासणीचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. कंसाबाहेरील आकडे तपासणीच्या ठिकाणांचे असून कंसातील आकडे त्यातील दूषित पाण्याच्या ठिकाणांचे आहेत. बारडगाव सुद्रिक- १५८ (५८), चापडगाव- १९७ (३४), कुळधरन- २९२ (७२), मिरजगांव- २३७ (५८) आणि राशिन- २३९ (४९).