महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महानगरपालिका निवडणुकीतील उमेदवारांची दुसरी यादी सोमवारी जाहीर केली. ही यादी पक्षात मोठा कलह माजवणारी ठरली आहे. प्रामुख्याने पक्षाचे प्रमुख नगरसेवक गणेश भोसले हेच या यादीने त्रस्त झाले असून त्यांच्या पत्नीची उमेदवारी कापल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. या एकाच प्रभागावरून पक्षात मोठी खळबळ उडाली असून भोसले यांनी टोकाची भूमिका घेऊ नये यासाठी आता जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.
मनपाच्या मागच निवडणुकीत भोसले व किशोर डागवाले असे दोनच नगरसेवक होते. या दोघांनीच मनपात पक्षाचे अस्तित्व राखले. या निवडणुकीत भोसले पती-पत्नी असे दोघेही रिंगणात उतरण्याच्या तयारीत होते. त्यादृष्टीने गेल्या दोन महिन्यांपासून त्यांनी मोर्चेबांधणी केली होती. त्याला पक्षाच्या स्थानिक नेत्यांचाही पाठिंबा होता. बुरूडगाव भागातील प्रभाग क्रमांक ३० मधून भोसले व त्यांच्या पत्नी संगीता हे दोघेही इच्छुक होते. ३० ‘ब’ मधून भोसले यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. मात्र अ मध्ये त्यांच्या पत्नी संगीता यांची उमेदवारी कापण्यात आली. त्यांच्याऐवजी सुरेखा कैलास भोसले यांना येथून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळेच गणेश भोसले संतप्त झाले आहेत.
पक्षाने सोमवारी २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. त्यात प्रामुख्याने माजी नगराध्यक्षा लता लोढा यांचा समावेश आहे. पक्षाने मागच्या आठवडय़ात २७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. अजुनही १९ जागांवरील उमेदवार जाहीर होण्याचे बाकी आहेत. त्यात प्रभाग क्रमांक ८, २५, ५, १९ आदी जागांचा समावेश आहे. राहिलेल्या जागांवरील उमेदवार आता उद्या (मंगळवार) म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीच जाहीर करण्यात येणार आहेत.
मनसेची दुसरी यादी     
प्रभाग १ (अ)- संध्या समीर पाटील, (ब)- कुशाबा म्हस्के, ६ (ब)- वीणा श्रीनिवास बोज्जा, ११ (अ)- किशोर कोटकर, १४ (अ)- पोपट पाथरे, १६ (अ)- शारदा बाबासाहेब जाधव, १७ (अ)- विनोद पुंड, १८ (ब)- निलेश खांडरे, २० (अ)- जयश्री जगनराव हुच्चे, २१ (ब)- लता वसंत लोढा, २५ (ब)- भिमाबाई किसनराव नळकांडे, २७ (ब)- नितीन भुतारे, २८ (ब)- सुवर्णा विरेंद्र शिंदे, ३० (अ)- सुरेखा कैलास भोसले, (ब)- गणेश भोसले, ३१ (अ)- गौरी गणेश ननावरे, (ब)- दत्तात्रेय खैरे, ३२ (अ)- शोभा रामदास कोतकर, (ब)- गोविंद आजबे, ३३ (अ)-मुकेश गावडे, ३४ (अ)-   लीलाबाई सुभाष कांबळे, (ब)- शिवाजी कोतकर.