कार्बाईड किंवा विषारी पावडर वापरून कृत्रिमरीत्या पिकवलेल्या फळांपासून नागरिकांची आता सुटका होऊ शकेल. इथेनॉल गॅसच्या साहाय्याने विकसित करण्यात आलेली रॅपनिंग चेंबरची सुविधा नगर शहरात उपलब्ध झाली आहे. नगर शहरातील (पंचपीर चावडी) इम्तियाज बागवान यांनी या पद्धतीने फळे नैसर्गिकरीत्या पिकवण्याचा प्रयोग केला आहे. प्रामुख्याने आंबा व केळीसारख्या फळांसाठी ही पद्धत अधिक उपयुक्त ठरली आहे.
उपविभागीय कृषी अधिकारी विठ्ठलराव गुंजाळ यांनी नुकतीच या नव्या तंत्राची पाहणी केली. त्यांनीही फळे पिकवण्याची ही पद्धत पूर्णपणे निर्धोक असल्याचा निर्वाळा दिला. ही फळे आरोग्यास कुठल्याच बाबतीत अपायकारक नसल्याचे त्यांनी सांगितले. इम्तियाज बागवान यांनी राष्ट्रीय फलोद्यान अभियानांतर्गत राज्य सरकारच्या फलोद्यान व औषधी वनस्पती मंडळाचे अर्थसाहाय्य घेऊन रॅपनिंग चेंबर उभारले आहे. त्याचीच गुंजाळ यांनी पाहणी केली.
गुंजाळ यांनी सांगितले की, मागच्या काही वर्षांपासून कार्बाईड किंवा विषारी पावडर वापरून कृत्रिमरीत्या फळे पिकवली जाऊ लागली आहेत. ही प्रक्रिया लोकांच्या आरोग्यास हानिकारक आहे. लोकांनीही त्याची धास्ती घेतली आहे. त्यामुळेच लोकांचे फळे खाण्याचे प्रमाण घटले होते. एकतर सामान्य ग्राहकास फळे घेताना यातील ज्ञान नसते, किंवा फळे कोणत्या पद्धतीने पिकवली आहे हेही समजू शकत नाही. त्याचाच गैरफायदा घेऊन कृत्रिमरीत्या फळे पिकवण्याचा उद्योग फोफावला आहे. या प्रकाराने फळांची बाजारपेठही संकुचित झाली असून लोकांमध्ये फळे टाळण्याचाच कल वाढतो आहे.
या गोष्टीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने विविध उपाय केल्यानंतर आता रॅपनिंग चेंबरचे तंत्र उपलब्ध करून दिले आहे. या तंत्राद्वारे पिकवलेल्या फळांचा खाणा-यांच्या आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. इथेनॉल गॅसच्या माध्यमातून ही फळे पिकवली जातात. या चेंबरची किंमत २१ लाख रुपये असून त्यावर कृषी विभागाचे ४० टक्के अनुदान आहे. केवळ व्यापारीच नव्हेतर शेतक-यांनीही या तंत्राचा अधिकाधिक फायदा घ्यावा असे आवाहन गुंजाळ यांनी केले. बागवान यांनीही शेतक-यांना आवाहन केले आहे. अल्प दरात त्यांची फळे येथे पिकवून देण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे.