मुंबईत मुसळधार पाऊस पडला की पाण्याने तुंबलेल्या मिलन सबवेचे चित्र हमखास वाहिन्यांवर झळकायचे. वाहतुकीचा बोऱ्या वाजून ट्रॅफिक जामचा त्रास नशिबी यायचा. पण यावर्षी बराच काळापासून रेंगाळलेला मिलन सबवे येथील उड्डाणपूल सुरू झाला आणि वाहिन्यांवरील ते प्रसिद्ध चित्र गायब झाले..अवघ्या सात मिनिटांत पूर्व आणि पश्चिम प्रवास सुरू झाल्याने मुंबईतील वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मिलन सबवे सखल भागात असल्याने थोडाही पाऊस झाला तरी तेथे हमखास येथे पाणी साठून वाहतूक विस्कळीत व्हायची. मुसळधार पावसाने थैमान घातले की हा भाग पाण्याखाली जाऊन कित्येक वेळा वाहतूक ठप्प व्हायची. त्यावर तोडगा म्हणून या ठिकाणी सांताक्रूझ लोहमार्गाना ओलांडून जाणारा उड्डाणपूल बांधण्याचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हाती घेतले. यावर्षी २४ मे रोजी ७०० मीटर लांबीच्या या चारपदरी उड्डाणपुलाचे उद्घाटन झाले.
त्यामुळे जूनच्या दुसऱ्या आठवडय़ापासून मुंबई व उपनगरात मुसळधार पावसाचे तडाखे बसल्यानंतर मिलन सबवे नेहमीप्रमाणे पाण्याखाली गेला. पण आता पूर्व-पश्चिम प्रवासासाठी हा उड्डाणपूल उपलब्ध असल्याने वाहनधारकांना वाहतूक कोंडीच्या कचाटय़ात न सापडता अवघ्या सात मिनिटांत इकडून तिकडे जाता येत आहे.
पूर्वी पाणी साचल्याने मिलन सबवे येथे वाहतुकीचा प्रचंड खोळंबा व्हायचा. हा उड्डाणपूल झाल्यामुळे एस. व्ही. रस्त्यावरून पश्चिम द्रुतगती महामार्गाकडे येण्यासाठी अवघी सात मिनिटे लागत आहेत, असे आकाश चंद्रा अशी प्रतिक्रिया या प्रवाशाने दिली. तर या उड्डाणपुलामुळे मोठी गैरसोय दूर झाली, पूर्व-पश्चिम वाहतुकीसाठी मोठी सोय झाली, असे अनिल दाणी यांनी प्रकल्पाबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले.
मिलन सबवे येथील हा उड्डाणपूल ‘एमएमआरडीए’चा प्रकल्प असला तरी तो पूर्ण करण्यासाठी मुंबई महानगरपालिका, वाहतूक पोलिसांनी मोठी मदत केली. समन्वयातून मुंबईकरांसाठी चांगला प्रकल्प राबवता येतो याचे हा उड्डाणपूल एक उदाहरण असून त्यामुळे प्रवाशांसाठी चांगली सोय झाली, असे प्राधिकरणाचे सहप्रकल्प संचालक दिलीप कवठकर यांनी सांगितले.