देशात अर्भकांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. अर्भकांना वाचवण्यासाठी ‘इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्स’ (आयएपी) या डॉक्टरांच्या संघटनेने ‘जॉन्सन अँड जॉन्सन’ कंपनीसह ‘फर्स्ट गोल्डन मिनिट’ हे अभियान सुरू केले आहे. या उपक्रमांतर्गत अर्भक पुनरूज्जीवन कार्यक्रम (एनआरपी) देशभर राबविला जात असल्याचे ‘आयएपी’चे कोषाध्यक्ष डॉ. बकुल पारेख यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
अर्भक मृत्यू दर कमी करण्याच्या उद्देशाने २००९ पासून हे अभियान सुरू करण्यात आले असून त्यात अर्भकांचा श्वास गुदमरून होणारा मृत्यू टाळण्यासाठी प्रसूती करणारे डॉक्टर, परिचारिका आणि सुइणींना विशेष प्रशिक्षण दिले जाते.  जन्मानंतरचा पहिला मिनीट (गोल्डन मिनीट) अत्यंत निर्णायक असतो. जास्तीत जास्त मृत्यू याच वेळात होतात. जवळपास ४० टक्के अर्भकांचा मृत्यू श्वासारोधाने होतो. जन्म परिचार पुनरूज्जीवनात प्रशिक्षित असेल तर अर्भक वाचू शकतात. अर्भक पुनरूज्जीवन कार्यक्रमाद्वारे (एनआरपी) दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणामुळे देशात बालमृत्यूचे प्रमाण कमी होऊ शकते. अर्भक पुनरूज्जीवन कार्यक्रमांतर्गत देशभर प्रशिक्षण देण्यात येत आहे. आधी केवळ प्रकल्प म्हणून सुरुवात झाली, आता ही एक चळवळ बनली आहे. नवजात शिशू सुरक्षा कल्याणम ही योजनाही राबविण्यात येत आहे, असे डॉ. पारेख म्हणाले.
नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण देशात ३० टक्के आहे. दरवर्षी ८.७ लाख शिशूंचा मृत्यू होतो. देशात प्रत्येक मिनिटाला दोन शिशूचा मृत्यू होतो. गुदमरून मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. अर्भक मृत्यू रोखण्यासाठी महाराष्ट्रात २२ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. गुदमरलेल्या अर्भकाचा श्वास सुरू करण्यास आरोग्य कर्मचाऱ्यांना शिकवले जाते. यासाठी विशिष्ट प्रकारची हवा भरण्याची पिशवी आणि मास्क वापरला जातो. या कार्यक्रमात महाराष्ट्र देशात अव्वल आहे, असे आयएपीचे राज्याचे समन्वयक डॉ. आकाश बंग यांनी सांगितले.
जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनच्या मदतीने राबविण्यात येत असलेल्या अर्भक पुनरूज्जीवन कार्यक्रमाद्वारे देशात हजारो अर्भकांना वाचविण्यात मदत करीत आहोत, असे जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनचे राष्ट्रीय व्यवस्थापक, उपक्रम अधिकारी मनीष टंडन म्हणाले.